पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे संगणक एका अभियंत्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून नेल्याचे घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी जसवंत कुमार अगरवाल (वय- ४२) यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली असून, दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुळीग करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन परिसरात फिर्यादी जसवंत हे रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान, पाऊस सुरू झालेला असल्याने व त्यात लाईट नसल्याने अंधाराचा फायदा घेत दबा धरून उभा असलेल्या दोन अज्ञातांनी डाव साधला. या दोघांपैकी एकाने अगरवाल बंदुकीचा धाक दाखवला आणि त्यांच्या गळ्यातील अंदाजे ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून घेतली. यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेप्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत. पावसाळा आणि त्यात करोना विषाणूचे वातावरण असल्याने नागरिक रात्री नऊ वाजेनंतर घराबाहेर पडताना दिसत नाहीत. त्यामुळे याचा गैरफायदा चोरटे उचलत असल्याचे दिसत आहे.