मुंबई : गेल्या काही वर्षांंपूर्वीपासून बासनात गुंडाळून ठेवलेल्या ‘नरिमन पॉइंट ते कफ परेड कनेक्टर’ प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक पूर्व सुसाध्यता अभ्यास अहवाल तयार करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकतीच निविदा काढली आहे.
सुमारे १.६ किमीचा हा सागरी सेतू असून, २००८ मध्ये तत्कालीन सरकारने त्यास मान्यतादेखील दिली होती. मात्र त्याच वेळी नरिमन पॉइंट पुनर्विकासाची योजना प्रस्तावित असल्याने हा सागरी सेतू मागे पडला. दरम्यान २०१९ मध्ये मुंबई महापालिकानेही हा सागरी सेतू बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पण त्यानंतर पुढे काही झाले नाही.
एमएमआरडीएने ११ जानेवारीला तांत्रिक पूर्व सुसाध्यता अभ्यास करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. त्याची मुदत ९ फेब्रुवारी असून, त्यानंतर अभ्यास अहवाल सादर करण्यासाठी जून २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर इतर तांत्रिक बाबी, परवानग्या होऊन प्रत्यक्ष कामाच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या नरिमन पॉइंट ते कफ परेडच्या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, त्यावर पर्याय म्हणून हा सागरी सेतू बांधण्याचे प्रस्तावित आहे.
या संदर्भात नुकतेच एमएमआरडीएच्या कार्यालयात झालेल्या एका बैठकीबाबत पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले. ‘मच्छिमारांच्या बोटींना कसलाही अडथळा निर्माण होऊ न देता हा सागरी सेतू लोकांचा प्रवास सुलभ करेल. या प्रकल्पाचा आराखडा जूनपर्यंत तयार होईल, अशा आशयाचे ट्विट त्यांनी के ले आहे.’
* सागरी सेतूंची महामुंबई.
सध्या मुंबई आणि परिसरात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू यांचे काम वेगाने सुरू आहे. तर मीरा भाईंदर ते वर्सोवा सागरी सेतू आणि वसई ते मीरा भाईंदर खाडी पूल असे दोन प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी वर्सोवा-मीरा भाईंदर या सागरी सेतूचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे, तर खाडी पुलासाठी आवश्यक परवानग्या घेऊन मग सविस्तर अहवाल तयार केला जाईल. हे दोन्ही प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रस्तावित असून, नरिमन पॉइंट ते कफ परेड या सागरी सेतूची त्यात भर पडेल.