सांगली :
सांगली महापालिकेत बहुमत असलेल्या भाजपचा महापौर, उपमहापौर निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव झाला. भाजपचे नगरसेवक फोडत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीने सत्ता परिवर्तन केले. महापौर राष्ट्रवादीचा, तर उपमहापौर काँग्रेसचा झाला. नवे महापौर दिग्विजय सूर्यवंशी शनिवारी सकाळी बारामतीत पोहोचले. गोविंदबाग येथे पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. याभेटीवेळी शरद पवार भलतेच खुश झाले. सांगलीतून नेलेली भडंग आणि पेढा खाल्ला आणि बरीच काही चर्चा केली.
नवे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर हे शनिवारी पहाटेच सांगलीहून बारामतीला मोठ्या साहेबांची म्हणजे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी निघाले. सकाळी दहा वाजता गोविंदबाग येथे पोहोचले. सांगलीचे महापौर आलेत म्हटल्यावर बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनाही त्यांनी बोलावून घेतले. महापौर, उपमहापौर निवडणुकीतील राजकारण, सभागृह कामकाज, योजनांचा पाठपुरावा आदी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
किती फुटले, किती अबसेंट होते
महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपचे सात नगरसेवक फोडण्यात राष्ट्रवादीला यश आले होते. त्या जोरावरच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपची सत्ता उलथवून लावली. त्यावर पवार म्हणाले, “ भाजपचे किती नगरसेवक फुटले. किती जण अबसेंट होते. हे सर्व कसे घडवून आणले?”, त्यावर संजय बजाज व राहुल पवार यांनी सर्व हकीकत सांगितली.
शरद पवार म्हणाले, सुरूवात तर भाजपने केली…!
सांगलीतील सत्तापरिवर्तनाची हकिकत ऐकल्यानंतर पवार म्हणाले, “केंद्र व राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपने आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर हल्ले केले. आपले नेते, कार्यकर्ते फोडून स्थानिक स्वराज्य संस्था बळकावल्या. आता त्यांचे नगरसेवक फुटले. त्यांची सत्ता तुम्ही खेचून घेतली बरे झाले. आलेल्यांना ताकद द्या. त्यांची कामे करा. ते आपल्याबरोबर यापुढेही काम करणार का?”. त्यावर बजाज म्हणाले, “फुटून आलेले आपलेच आहेत. पूर्वी ते आपल्याकडून त्यांच्याकडे (भाजप) गेले होते. पूर्वी त्यांनी आपल्यासोबत काम केलेले आहे. त्यामुळे काहीच अडचण नाही”.
पवार म्हणाले, सांगलीतून चांगली सुरूवात..
पवार म्हणाले, सांगलीत भाजपची सत्ता खेचून काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आणलीत बरे झाले. सांगलीतून चांगली सुरूवात झाली. राज्यभर आता त्याचे लोण पोहोचेल.
अडचण आली तर मला सांगा..
पवार म्हणाले, “महापालिकेच्या माध्यमातून चांगली कामे करा. सभागृह चांगले चालवा. सर्वांना बरोबर घेऊन काम करा”. दरम्यान महापौर सूर्यवंशी यांनी ड्रेनेज योजना, घनकचरा व्यवस्थापन, शेरीनाला योजना, एलईडी योजनांबाबत माहिती दिली. विकास कामांसाठी निधीची गरज व्यक्त केली. त्यावर पवार म्हणाले, “ जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करा. सांगलीसाठी काहीही कमी पडणार नाही. काही अडचण आल्यास मला सांगा.
अर्ध्या तासाच्या सविस्तर चर्चेनंतर सांगलीचे शिष्टमंडळ उठले आणि सांगलीकडे निघाले. या भेटीत भलतेच खुश झालेले पवार साहेब पाहून सांगलीचे महापौर व पदाधिकारीही भलतेच खुश झाले.