पुणे ः प्रतिनिधी
राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते 9 या वेळेत खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. पालिका आयुक्तांनीही तसे पत्रक जाहीर केले आहे. मात्र, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना आज (मंगळवार, दि. 4 मे) सकाळी 9 वाजताच दुकाने बंद करा असे सांगितले. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह भाजीविक्रेत्यांमध्ये गोंधळ उडाला. अचानक कर्फ्यू लागू केला की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली होती.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध केले आहेत. सोमवार ते शुक्रवार दरम्यान भाजीपाला, फळविक्री, दूध, स्वीट होम, किराणा मालाची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत खुली ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, हडपसर अतिक्रमण विभागाने आज (मंगळवार, दि. 4) सकाळी 9 वाजता मांजरी फाटा चौकापासून महादेवनगर रस्त्यावरील दुकाने बंद करा, असे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सांगितले. अचानक 9 वाजता दुकाने का बंद करायची असा प्रश्न येथील भाजीविक्रेत्यांसह मटण विक्रेत्यांना पडला. दरम्यान, पालिकेच्या वाहनातील अतिक्रमण विभागाच्या गाडीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्याला विचारले आता 9 वाजले आहेत, राज्य शासनाने 11 वाजेपर्यंत भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकानांना परवानगी दिली आहे. तेव्हा कर्मचारी म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे दुकाने बंद करण्यास सांगत आहोत, असे सांगून ते निघून गेले.
दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाला हडपसर- गाडीतळ ते गांधी चौक आणि मंत्री मार्केट ते क्षेत्रीय कार्यालयापर्यंत सकाळी खच्चून गर्दी असते ती दिसत नाही का, तेथे कोरोना येत नाही का, हडपसर गाडीतळ गांधी चौक दरम्यान कोरोनाबाधित कोणीच नाही का, असे एक ना अनेक प्रश्न महादेवनगर रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांनी उपस्थित केले. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पदपथ दुकानदारांनी मालकीचे करून घेतले आहेत. त्यांच्यावर का कारवाई करत नाही, असा सवालही अनेक भाजीविक्रेत्यांनी उपस्थित केला.
अतिक्रमण विभागातील निरीक्षक गणेश तारू म्हणाले की, प्रशासनाच्या नियमानुसार अनधिकृत भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे सर्वच ठिकाणी एकावेळी कारवाई करण्यात अडचणी येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, नागरिकांना 9 वाजता दुकाने बंद करा असे सांगितल्यानंतर 11 वाजता बंद करतात, असे त्यांनी सांगितले.
हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त सोमनाथ बनकर म्हणाले की, अनधिकृत भाजीविक्रेत्यासह अत्यावश्यक सेवेशिवाय जी दुकाने सुरू असतात, त्यांच्यावर कारवाई केली जाते. जीवनावश्यक वस्तूंसह अत्यावश्यक सेवेतील दुकानांना 7 ते 11 ही वेळ दिली आहे. या वेळेशिवाय जी दुकाने सुरू ठेवली जातात, त्यांच्यावर कडक कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.