हडपसर,
रिझर्व्ह बँकेच्या जाचक अटींमुळे साधना बँकेची शेड्युल्ड बँक(Sadhana Bank) होण्यास विलंब होत आहे. सगळे नियम पाळून साधना बँक लवकरच शेड्युल्ड बँक होण्यासाठी बँक प्रयत्न करत आहे. याशिवाय बँकिंग क्षेत्रात जगात सुरू असलेल्या सेवा साधना बँक ग्राहकांना देत आहे. बँकेने आधुनिकीकरण स्वीकारले असून, त्याचाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आज साधना बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी यूपीआय सेवा सुरू केली आहे, ही कौतुकास्पद कामगिरी आहे, असे गौरवोद्गार आमदार चेतन तुपे यांनी काढले.
हडपसर येथील साधना सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत यूपीआय सेवेचा शुभारंभ आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व साधना बँकेचे सुकाणू समितीचे सदस्य दिलीप तुपे, साधना बँकेचे चेअरमन अनिल तुपे, व्हाइस चेअरमन आबासाहेब कापरे, तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
आमदार तुपे म्हणाले की, बँकिंग क्षेत्राला सायबर धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यासाठी बँकांनी अद्ययावत तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. यूपीआय सेवेमुळे कॅशलेश व्यवहार होण्यास मोठी मदत होणार आहे. बँकेच्या जडघडणीत पदाधिकारी, सभासद वर्गाबरोबरच कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे आहे. बँकेच्या मुख्यालयाचे काम पूर्णत्वास जात असून लवकरच या नवीन जागेत बँकेच्या मुख्य कार्यालय स्थलांतरित होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चेअरमन अनिल तुपे यांनी सांगितले की, बँकेने आधुनिक तंत्रज्ञान वापरून सेवा ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून सेवा सुरू ठेवली आहे. बँकेच्या वाढीसाठी यूपीआय सेवेचा हा टप्पा महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुकाणू समितीचे सदस्य दिलीपआबा तुपे म्हणाले की सभासद, पदाधिकारी , कर्मचारी आणि ग्राहकांनी बँकेला वेगळ्या स्थानावर नेवून ठेवण्याचे काम केले आहे, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. कोरोना काळातही बँकेची वाटचाल चांगली सुरू आहे. स्पर्धेत टिकून आवश्यक त्या गोष्टी शिकण्यासाठी बँक नेहमीच पुढे राहील. अधिक चांगल्या पद्धतीने आणखी ग्राहकांना सुविधा देण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.
संगणक अधिकारी अनिल महाजन म्हणाले की, यूपीआय सुविधेसाठी खातेदाराने आपल्या मोबाईलवरुन बँकेचे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे, एटीएम कार्ड घेऊन एकच मोबाईल नंबर रजिस्टर करावा. त्यानंतर गुगल पे, फोन पे, पेटीएम यापैकी एक ॲप डाऊनलोड करून त्यावर साधना बँक खाते ॲड करून युपीआय पिन नंबर आणि पासवर्ड देऊन पुढे ऑनलाईन सर्व व्यवहार करता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चारूचंद्र सोहोनी यांनी आभार मानले.