पुणे

ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदतीची गरज अशोक बालगुडे ः समाजातील दानशूर पुढाकार घेण्याची आवश्यकता

 

पुणे ः प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे मागिल वर्षीपासून शाळा बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू केली आहे. मात्र, गरीब होतकरू विद्यार्थ्यांकडे अँड्राइड फोन अथवा नेटसाठी पैसे नसल्याने त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे आले पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे यांनी व्यक्त केले.

हडपसर-लक्ष्मी कॉलनीमधील ज्ञानसागर प्राथमिक आणि श्रीमती क. द. कोतवाल माध्यमिक विद्यालयाला मानवतावादी सेवा संघटनेने ३० पुस्तकांची भेट दिली. याप्रसंगी भेकराईमाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर बर्गे, मानवतावादी सेवा संघटनेचे सचिव अशोक जाधव, अरविंद पिल्ले, कार्याध्यक्ष प्रकाश रावळकर, आजीव सदस्य महमुदशहा भंडारी, रोहिदास एकाड, बाळू बारवकर, सतीश जाधव आणि विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जाधव म्हणाले की, अलीकडे पुस्तक आणि वृत्तपत्र वाचनाची सवय कमी होताना दिसत. मोबाईलवर दिवसभर चॅटिंग करण्यात अनेक मंडळी धन्यता मानत आहे. मात्र, पुस्तक वाचनासारखा दुसरा मित्र नाही. विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये उत्तम यश मिळवायचे असेल तर, पुस्तकांबरोबर अवांतर वाचन वाढविण्याची गरज आहे,. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा पाया असतो आणि तो पाया जर भक्कम झाला, तर तो विद्यार्थी पुढील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करतो. शिक्षणातून विद्यार्थी चांगले घडत आहेत अशा शिक्षकांचा सन्मान झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
प्रतिभा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कुणाल ताजणे यांनी आभार मानले.
भेकराईमाता शिक्षण संस्थेच्या ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतीम बर्गे आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.