पुणे

एका विवाहितेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

हवेली प्रतिनिधी :- अमन शेख

एका 28 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. थेऊर (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील काकडे मळा परिसरात रविवारी (ता. 12) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खोलीतून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने पतीने तिस-या मजल्यावर जाऊन खिडकीतून पाहिले. त्यावेळी पत्नीचे आत्महत्या केल्याचे दिसताच जबर धक्का बसल्याने तिस-या मजल्यावरून पडून ते गंभीर जखमी झाले आहेत.

अश्विनी रामेश्वर लाखे (वय- 28 रा. काकडे मळा, थेऊर, ता. हवेली मूळ रा. गेवराई, जिल्हा बीड ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर रामेश्वर हनुमंत लाखे, (वय-32 ) हे जखमी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर लाखे व त्यांची पत्नी अश्विनी हे महिनाभरापूर्वीच थेऊर येथे राहयला आले होते. रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रामेश्वर लाखे हे घरी आले. तेंव्हा पत्नी अश्विनीला वारवार आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी तिसऱ्या मजल्यावर जाऊन खिडकीतून पाहिले असता पत्नी अश्विनीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. दरम्यान, पत्नीने आत्महत्या केल्याचे दिसताच रामेश्वर यांना धक्का बसला व ते तिसऱ्या मजल्यावरून कोसळून गंभीर जखमी झाले आहेत.