प्रतीनिधी: स्वप्नील कदम.
लोणी काळभोर: अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना कोळवडी येथील तलाठी राजेश दिवटे यांच्यावर तीन दिवसापूर्वी दहा ते बारा वाळू माफियांनी हल्ला केला होता. या हल्लेखोरांना अटक होत नाही, तोपर्यंत हवेली तालुका तलाठी संघटनेने आजपासून तालुक्यातील कामकाज बंद करण्यात निर्णय घेतला आहे. याला पुणे तलाठी मंडलाधिकारी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे.
याबाबत संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी, उपविभाग हवेली यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत तालुकाध्यक्ष पवन कुमार शिवले म्हणाले की, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी शुक्रवारी ( दि.24) सकाळी 7.50 च्या सुमारास शेवाळवाडी येथे रुकारी पेट्रोल पंपासमोर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर कारवाई केली होती. सदर वाहने तलाठी राजेश दिवटे तहसील कार्यालय घेऊन जात असताना आठ ते दहा जणांनी गणेश ऑटोमोबाईल्स रिपेरींग सेंटर समोर, हडपसर येथे अडवून दिवटे यांना दमदाटी व मारहाण केली.
बऱ्याच वेळा रात्री अपरात्री अवैध वाळू वाहतूक वाहनांवर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालय मार्फत पथके नेमली जातात. परंतु संरक्षणासाठी त्यांच्यासोबत कुठलाही पोलीस कर्मचारी नेमून दिला जात नाही. परिणामी अशा स्वरूपाची अनुचित घटना घडल्यास संबंधित कर्मचारी अथवा अधिकारी त्यांच्या जीवावर बेतू शकते. यापुढे तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा पोलीस संरक्षणाशिवाय कुठलीही कारवाई करू नये. तसेच यापुढे अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करताना कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व पोलिस संरक्षण असल्याशिवाय कोणताही कर्मचारी अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करताना उपस्थित राहणार नाही. असे नमूद पत्रकात नमूद केले आहे.