प्रतिनीधी : स्वप्नील कदम
लोणी काळभोर :पिंपरी सांडस येथील धड आणि शरीरावेगळं झालेल्या खूनप्रकरणातील चौकशीत बरे वाईट होईल या भीतीपोटी भवरापूर येथील तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. लोणी काळभोर तसेच पुणे शहरच्या गुन्हे पथकाच्या पोलिसांनी या खून प्रकरणी त्याची सलग तीन दिवस चौकशी केली होती. दरम्यान या आत्महत्या केलेल्या व्यक्तिकडुन चिठ्ठी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बाबासाहेब बबन काटे (वय-३२, रा. भवरापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पिंपरी सांडस येथे भीमा नदीत संतोष गायकवाड याचे शिर व हातपाय छाटलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तसेच पुणे शहरच्या गुन्हे पथकाच्या तपासासाठी काटे याची सलग तीन दिवस चौकशी केली होती. याबाबत एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून पोलिसांच्या चौकशीत बरे वाईट होईल या भीतीने आत्महत्या केल्याचे सापडलेल्या चिट्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे भीतीपोटी त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
सतत तीन दिवस चौकशी केल्यामुळे दुःख झाले आहे. तसेच हा खून कुणी व का केला याची मला माहिती नाही. पोलिस माझी चौकशी करीत असल्याने माझ्या कामाच्या ठिकाणी खाडे होत आहेत. माझ्याकडे पैसे नाहीत व मी मेल्यानंतर माझ्या मुलीचे व बायकोचे कसे होणार? माझ्यावर कोणताही दबाव नाही. घरच्यांना कोणीही त्रास देऊ नका. मला जेवढी माहिती होती तेवढी मी पोलिसांना दिली आहे. मला मरायचे नव्हते पण माझे नाव आले त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मी जेवलो नाही किंवा झोपही लागली नाही. मला माझ्या मुलीला शिकवायचे होते. परंतु मला खूप टेंशन आल्यामुळे मी औषध घेत आहे. पोलिसांना जबाबदार ठरवत नसल्याचेही चिट्ठीत नमूद करण्यात आले आहे.
काटे याची तीन दिवस केवळ चौकशी करण्यात आली. त्याला ताब्यातही घेण्यात आले नव्हते. पोलिसांच्या या कृतीमुळे एक तरुण आत्महत्या करतो, त्यामुळे ही चौकशी त्याच्या जीवावर उठली, अशी कुजबुज सध्या गावात सुरू आहे. एकंदरीतच काटे याच्या आत्महत्येनंतर पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.