Uncategorizedपुणे

हडपसर उड्डाणपूलाची कथा आणि व्यथा ! हडपसरच्या वाहतूककोंडीतून कधी होणार सुटका?

सुधीर मेथेकर
पुणे

हडपसर येथील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसे तीन उड्डाणपूल बांधण्यात आले. त्यात पहिला उड्डाण पुल रेल्वेमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे-सोलापूर रस्त्यावर रामटेकडी ते वैदवाडी (किर्लोस्कर न्यूमेटिक समोर) सुमारे 35 वर्षांपूर्वी बांधण्यात आला. त्यानंतर उपनगराचे झपाट्याने होणारे शहरीकरणामुळे व होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हडपसर गाव ते गाडीतळ पर्यंत हा वादातीत उड्डाणपूलाचे काम हाती घेतले. हडपसरच्या उड्डाणपुलास सुमारे 22 कोटी खर्च आला होता. 2007 साली पूर्ण झाला.

सुरुवातीपासून विरोध झालेल्या या उड्डाणपूलाचे काम कसेबसे पूर्ण झाले. खरं तर नियोजित उड्डाणपूलाचे काम पुर्वी वाय आकाराचाच होता. परंतु अनेक अडथळे व विरोधामुळे त्यावेळी वाय या आकाराचा पुल झालाच नाही. कालांतराने ज्यावेळी परत वाहतूक समस्या जाणवायला लागली त्यानंतर द्रविड प्राणायाम करुन पुणे-सोलापूर या उड्डाण पुलावरून सासवड कडे जाणार पुल अस्तित्वात आला. यामुळे हडपसरकरांनी सुटकेचा श्वास सोडला !

परंतु यावर्षीच्या सुरुवातीलाच या उड्डाण पुलावरून जाता येता हादरे बसत असल्याचे जाणवायला लागले आणि जेमतेम 15 वर्षांतच
डागडुजीसाठी पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला अन् हडपसरकरांना पुन्हा एकदा या वाहतूक कोंडी मुळे मनस्ताप सोसायची वेळ आली आहे.

आमदार, नगरसेवकांनी मुंबईच्या तज्ज्ञ पथकाद्वारे पाहणी केली. यात बेअरिंगमध्ये त्रुटी आढळल्या. महापालिकेच्या दुसऱ्या तज्ज्ञ पथकाने पुन्हा उड्डाणपुलाची पाहणी केली. यात त्यांनी उड्डाणपूल बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने उड्डाणपूल दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला.
हडपसर उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी एक महिना उड्डाणपूल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलावरील मार्गांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

खरं तर पुणे शहरात ब्रिटिशकालीन कित्येक उड्डाणपुल सुमारे शंभर वर्षांपासून अस्तित्वात आहेत, ते मजबूत आहेत असे बोलले जाते.
सुमारे 25 कोटी खर्च करून तयार केलेल्या या पुलाला 15 वर्ष झाले आहेत.परंतु हा पुल 15 वर्षातच दुरुस्तीसाठी आला त्यामुळे येथील नागरिकांना भिती वाटते ! हे असे कसे झाले !

कुठल्याही पर्यायी मार्गाची व्यवस्था न करता उड्डाणपूलाची वाहतूक बंद केल्याने रस्त्यावर लांबलचक रांगा लागतात. वाहतूक कोंडी होऊन चाकरमान्यांना हाल सोसावे लागत आहेत. जेथे 5-10 मि.मध्ये पोहचत तेथे सुमारे तासभर कोंडी मधून मार्ग काढावा लागतो आहे. पादचाऱ्यांना तर आता रस्ताच उरला नाही. अँम्बुलन्सला सुध्दा तातडीने रस्ता पार करता येत नाही. त्यामुळे आजारी माणसाचे हाल होत आहेत.

लवकरात लवकर उड्डाणपूलाचे काम पुर्ण करून चालू करावा व नागरिकांना या वाहतूक कोंडीतून सोडवावे ही मागणी आता जोर धरू लागली आहे.

(लेखकाने दैनिक लोकसत्ता मध्ये अनेक वर्ष लिखाण केले आहे)