हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
साहित्य सम्राट पुणे संस्थेचे १२९ वे कविसंमेलन लोहिया उद्यान हडपसर येथे अतिउत्साही वातावरणात पार पडले. ‘एका कवीच्या कवितेचा अविष्कार’ या संकल्पनेच्या संमेलनात वेळेअभावी थोड्याच कवी-कवयित्रींना संधी मिळाली. प्रथम जेष्ठ कवी.सूर्यकांत नामुगडे यांनी ‘तरी आम्ही म्हणावे भारत महान’ हि वास्तववादी कविता सादर केली.
शरमेने झुके तिरंगा,त्याच्याच साक्षीने दंगा
सत्येच्या हव्यासापायी चालला नाच हा नंगा
आम्ही पहावे गुमान,तरी म्हणावे भारत महान
माणसांनीच अविचारीची कृती कशी रूढ केली आहे.याचे स्पष्ट चित्रण चर्चेतून दृष्टीस पडले. या कवितेमार्फत पुढारी, संस्कृती, भक्त,काम,पदवी,सत्य-असत्य, घरचे शत्रू,स्वार्थी प्रवृत्ती, दंगे, समाज,हुतात्मे, तिरंगा आणि सुराज्य अशा सर्वच क्षेत्रात चाललेली वैचारिक घरसरण चर्चली गेली आहे. म्हणून कवीचा प्रश्नरुपी शीर्षक सार्थ ठरतो.
‘जीवाचे हाल (भीती)’ हि कविता डॉ.पांडुरंग बाणखेले यांनी काल्पनिक कविता सादर केली.
भर दिवसा काळीज माझं चोरी गेलं काल
काय सांगू झाले माझ्या जीवाचे या हाल
ही कविता काल्पनिक जरी असली तरी प्रेमविषयीशी प्रत्येकजन जोडलेला असतो. त्यामुळे अशा कविता गेय स्वरूपात सरस ठरतात. पण इतर कविता गेय ऐवजी सरळ शब्दातील सादरीकरणानेच सार्थ ठरतात. पुढचे कवी सुभाषमहाराज बडदे यांनी ‘देव पुजला’ ही विद्रोह मांडणारी कविता सादर केली.
देवाला या मानत नाही असतो दगडात देव ?
लादलेली पुजारीशाही पुरता कोंडला की जीव
आज मंदिरातील भ्रष्टाचार, व्यापार, अंधश्रद्धा, दगडाचा देव आणि भक्ती याचे थोतांड कसे माजले आहे हे चर्चेतून समोर आले.विद्रोह हा सत्य निर्भडपणे मांडणारा साहित्य प्रकार आहे. तो त्याच ताकदीने समाजापुढे ठेवला पाहिजे.
कवी किशोर टिळेकर यांनी ‘अतिक्रमण’ हि डोळ्यात अंजन घालणारी कविता समोर आणली.
मृत्यू शय्येवरही अतिक्रमण आडवं येतं
पाचफुटी देहाला फुटातच गाडलं जातं
समाजात सुधारलेल्या आपल्याच लोकांकडून वस्तूपासून रक्तापर्यंत अतिक्रमण कसे केले जाते हा विचार चर्चेतून अनेक अंगांनी स्पष्ट झाला. पुढे आशाताई शिंदे यांनी ‘माझी मराठी’ ही कविता सादर केली.
माझी मराठी मराठी वाटे तिचा अभिमान
कड्या कपारीत गुंजे माझ्या मराठीचं गाणं
भाषेवर प्रेम करण्यासाठी कोणत्याही व्याकरणाची किंवा अलंकाराची आवश्यकता नसते.ती आपल्या आई सारखीच असते. म्हणून तिला प्रमाण असण्याची गरज नसते.हा विचार पुढे आला.
कवी गणेश पुंडे यांनी ‘लाचारी’ या कवितेतून समाजातील लाचार जीवन दाखवले.
जीवनाला त्रस्त झालो मी हारलो कित्येकदा
जो तो घेतो जीवनात लाचारीचा फायदा
आज कोणी अडचणीत दिसला की माणसं त्याचे लचके तोडतात. मजबुरी किती भयानक असते?, संकटे चहुबाजूंनी येत राहतात.कधीकधी निसर्गसुध्दा कोपतो.मग हतबल झालेला झुंज देताना हार मानतो. अशी हृदयद्रावक भावस्पर्शी कविता समाजाला माणुसकी जोपासण्यासाठी आव्हान करते.हे चर्चेतून स्पष्ट झाले. नंतर कवी चंद्रकांत जोगदंड यांनी आपल्या पहिल्या कवितेचा प्रवास सांगितला. ‘नाम तुझे गोड’ हि प्रेमावरची कविता पुढे आणली.
तुझे गोड नाम शुभ्र निळे आकाश
देऊनी मजशी गेले दोन क्षण सहवास
तारुण्यात कवी प्रेमावरच कविता लिहतो अशी कल्पना आहे. परंतु कोणत्या कवीला,कोणता वेळी आणि कोणत्या प्रसंगात कविताक्स सुचेल हे सांगता येत नाही.त्यामुळे कोणत्याही कवितेची समीक्षा त्रयस्थ व्यक्ती करूच शकत नाही. हे या चर्चतून स्पष्ट झाले.
शेवटी संस्थेचे अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी परिवर्तनवादी विचार सांगणारी गझल सादर केली.
भंगली ना कालची ती वेस जाडी
आजच्या पीढीस दे आकार दोस्ता
यावर चर्चा करताना दोस्त हा आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असतो. दोस्तांसाठी दोस्ताने चांगलाच विचार केला पाहिजे. दोस्ताने समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा नाहीशा करून विविध परिस्थितीला धाडसाने क्रांती करून समाजात नवीदिशा रुजविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दोस्त हाच समाज असू शकतो. असा विचार पुढे आला.
अशाप्रकारे अतिशय महत्वपूर्ण अशा ‘एका कवीच्या कवितेचा अविष्कार’ या संकल्पनेत कवींच्या उणिवा सांगताना कोणी थांबू नये आणि उणिवा समजून घेताना कोणी नाराजसुद्धा होऊ नये. असा विचार घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.