किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीतील सेवानिवृत्त कामगार,कर्मचारी आणि अधिकारी यांचा स्नेह मेळावा विष्णूजीकी रसोई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी साठी ओलांडलेले सुमारे पासष्ट मंडळी जमली होती.
हास्य, गप्पा, पाठीवर थाप अशा विविध आनंदी छटांचा अनुभव मंडळी यावेळी घेत होती. या मेळाव्यात वयाची पंचाहत्तरी पार केलेले तरुण एकमेकांना भेटल्यावर आपण आता काय करत आहोत, सेवानिवृत्ती नंतरचा वेळ आपण नातवासोबत आनंदाने कसा वेळ घालवत आहोत, सहलीची मजा कशी लुटत आहोत तर काही जण आजूनही तरुणांना लाजवेल असा आपला छंद कसा जोपसत आहोत हे आवर्जून सांगत होते.
या मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त व्यवस्थापकीय संचालक हरी मुस्तीकर म्हणाले आपल्या सर्वांच्या व विशेष करून कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आपण कंपनीची भरभराट करु शकलो. कंपनीला आपल्या सर्वांच्या यथोचित कामामुळे फायदा झाला हे मला विसरता येणार नाही. आपल्या सर्वांची केपीसीएल कंपनीबद्दल असलेली आस्था व घेतलेली मेहनत हीच खरी कंपनीची संपत्ती आहे असे मला वाटते. आज साठी ओलांडलेले तरुण मित्र एकत्र आलोत, भेटलो याचा मनस्वी आनंद झाला आहे.
यावेळी पंचाहत्तरी ओलांडलेल्या, निवृत्त व्यवस्थापकीय संचालक हरी मुस्तीकर तसेच दादा देशपांडे, गुप्ते, कामत, पलंगे, वडके ,सावंत,जोशी, विद्याधर जोशी, गंभीर, व्हि.एच. कुलकर्णी, पी.एम. वैशंपायन, पी.व्ही.सोमसुंदर आदींचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे श्री .प्रमोद देशपांडे( माजी व्हाइस प्रेसिडेंट मार्केटिंग एसीडी) व श्री. हरी मुस्तीकर(माजी एमडी केपीसीएल ) यांच्या हस्ते हुरहुन्नरी व अष्टपैलू श्री.विलास बाबर यांचा स्पेशल सत्कार सीआयआय बिझनेस व एचआर एक्सलन्सचे मागील 15 वर्षापासून असेसर/परीक्षक आणि यावर्षी किर्लाेस्कर फेरस कंपनीसाठी एक्सलन्ससाठी एचआर असेसर म्हणून योगदान दिल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
मेळाव्याचे नियोजन, संयोजन सुधीर मेथेकर, मुकुंद शालूकर, अजित निरगुडकर, शहा व बरवें यांनी केले तर सुत्रसंचालन उद्योजक विलास बाबर यांनी केले.