पुणे – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार झाला नसताना काँग्रेस अध्यक्षा, खा. सोनियाजी गांधी आणि काँग्रेसचे नेते, खा. राहुलजी गांधीना बदनाम करण्यासाठी भाजपचे केंद्र सरकार दडपशाही करत आहे. परंतु, काँग्रेस त्यापुढे झुकणार नाही, असे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
केंद्रातील मोदी सरकारचा निषेध मोहन जोशी यांनी केला आहे. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरुन काढण्यामागे गांधी कुटुंबियांना बदनाम करण्याचा डाव आहे. त्यातून ईडीमार्फत काँग्रेसचे नेते, खा. राहुलजींची चौकशी केली जात आहे. ही निव्वळ मनमानी आहे. नेहरु, गांधी कुटुंबाने स्वतःची संपत्ती देशाला दान दिली. देशासाठी बलिदान दिले. त्या कुटुंबाला ईडीमार्फत त्रास देणं संतापजनक आणि निषेधार्ह आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, रुपयाची घसरण, काश्मीरातील पंडितांची हत्या आणि पलायन या विषयांवरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार हे काँग्रेसच्या अध्यक्षा, खा. सोनियाजी गांधी आणि काँग्रेसचे नेते, खा. राहुलजी गांधी यांच्यावर द्वेषभावनेतून कारवाई करत आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.