केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर प्रस्तावित केलेली जी.एस.टी दरवाढ, गॅसच्या दरात झालेली वाढ,राज्य सरकारने वीज दरात केलेली वाढ या सर्व महागाईच्या आघातांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौक येथे “महागाई विरोधी आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनासाठी या सर्व महागाईचे नायक श्री.नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते परंतु त्यांनी स्वतः न येता आपले प्रतिनिधिक स्वरूपात आपल्या सर्वात आवडत्या प्रतिनिधी गरिबी, महागाई व बेरोजगारी यांना आंदोलनासाठी पाठवले. यावेळी बोलताना गरीबी,महागाई व बेरोजगारी यांनी सांगितले की, “गेल्या आठ वर्षात मोदीजींनी आम्हाला एकही दिवस सुट्टी दिली नाही.आमचा उपयोग करत मोदीजी देशातील जनतेला लुटत असून आम्हाला जनतेची किव येते परंतु मोदीजींना येत नाही.कृपया जनतेनेच मोदींना धडा शिकवत आमची या त्रासातून मुक्तता करावी”.
या आंदोलन प्रसंगी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशातील नागरिकांनी आपल्या मूलभूत गरजा भागवायच्या कश्या….? असा प्रश्न या देशातील प्रत्येक नागरिकास पडत आहे. याचं कारण आहे, जी.एस.टी परिषदेत केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातील मूलभूत वस्तू तेल, तूप, पनीर या जीवनावश्यक वस्तूंवर देखील जी.एस.टी वाढवण्याची तरतूद केली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होत आहे की , अगदी मूलभूत जीवनावश्यक वस्तूंवर देखील जी.एस.टी लागल्यानंतर या गोष्टी महाग होणार आहेत. त्याचप्रमाणे घरगुती गॅसच्या किमतीत देखील तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.गेल्या आठ वर्षात घरगुती गॅस जवळपास 152 % नी वाढला असून स्वयंपाक घरातील प्रत्येक गोष्ट महाग करण्याचा केंद्रातील मोदी सरकारने जणू विडाच उचलला आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेले एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजेच ED सरकार देखील केंद्राच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा महागाईचा कित्ता गिरवत आहे. राज्यातील सरकारने सत्तेवर येतात पहिल्याच आठवड्यात वीज दरवाढीचा शॉक सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे
केंद्र व राज्य सरकार या दोघांकडून होत असणारी ही जनतेची लूट थांबावी जनतेला आपले जीवन सुसह्य व्हावे, याकरीता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे आंदोलन घेण्यात येत आहे.
पावसाची संततधार सुरू असताना देखील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलन उपस्थित होते. विशेषतः महिला भगीणींची मोठी संख्या आंदोलनात पाहायला मिळाली. तसेच जीवनावश्यक वस्तू, घरगुती गॅसचे दर वाढल्याने सर्व महिला भगिनींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रदीप देशमुख ,सुरेश गुजर, अजिंक्य पालकर, हेमंत बघे, सागर राजे भोसले, अमोल ननावरे, नरेश पगड्डालू, शशिकला कुंभार, प्रतिभा गायकवाड, वर्षा ढावरे, पुजा झोळे, मिना पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.