विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ईडी सरकारविरोधात विरोधी पक्ष आक्रमक…
मुंबई दि. १७ ऑगस्ट – ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… ईडी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… आले रे आले ५० खोके आले… खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… स्थगिती सरकार हाय हाय… महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी… आले रे आले गद्दार आले.. अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला…
आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आक्रमकपणे सरकार विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले.