पुणे

“जगप्रसिद्ध हडपसर – पुण्याच्या पूर्व भागात ऐतिहासिक महत्व असलेले, झपाट्याने विकसित होणारे उपनगर टाऊनशिपचे शहर म्हणून उदयास येतेय”

हडपसर उपनगरात आपले स्वतःचे, घर, फ्लॅट, व्टिन बंगलो, स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये घर असावे असे आता सर्वांना वाटायला लागलं. खरंतर कानामात्रा, आकार, ऊकार, वेलांटी व जोडाक्षर नसलेलं परंतु जगप्रसिद्ध आमच्या “हडपसर” मध्ये यावे वाटते त्याची काय वर्णावी महती ! आज जरी सिमेंटच्या गगनाला भिडणार्या उंच उंच इमारती पाहून अप्रूप वाटतं असले तरी एक काळ असा होता की सर्व भाग हिरवाईने नटलेला होता. भारतातील प्रसिद्ध सुभाष सामुदायिक सहकारी शेती संघ हा शेती व्यवसाय सहकाराच्या तत्वावर करणारा आदर्श संघ हडपसर येथीलच जो आजही जोमाने कार्यरत आहे. शेतकऱ्यांचे हित जपणारे पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडई जेथे शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला विनादलाल थेट ग्राहकाला विकणारे हे केंद्र हडपसर येथीलच. अगदी थेऊरच्या चिंतामणी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मनाला मोहित करणारी हिरवी गर्द झाडी होती. उसाचे मळे, द्राक्षाच्या बागा, पुष्पवाटिका हे एकेकाळी हडपसरचे वैभव होते.

आता हडपसरच्या वैभवात आणखी भर पडली ती मोठमोठ्या जगप्रसिद्ध मगरपट्टा सिटी, अमनोरा पार्क, कुमार प्रॉपर्टीज् मुळे. आता हे उपनगर अगदी उरळीकांचन पर्यंत विस्तारित गेले आहे. मोठमोठ्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांनी आपले आकर्षक इमले उभे केले आहेत. त्यामुळे ग्राहक आकर्षित होत असतील तर नवल ते काय?

पूर्वी राष्ट्रसेवादलाचे केंद्र असलेल्या हडपसरने अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिले, अनुभवले. जेष्ठ अभिनेते स्व.निळूभाऊ फूले, डॉ. बाबा आढाव, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे डॉ. दादा उर्फ सि.तू. गुजर, स्वातंत्र्य सेनानी तथा मा.आमदार रामभाऊ तुपे, शिक्षण महर्षि पतंगराव कदम, मा.खासदार विठ्ठलराव तुपे आणि महाराष्ट्राताचे चालते बोलते साने गुरुजी म्हणून संबोधले जाणारे, जेष्ठ विचारवंत, मा.आमदार डॉ. ग.प्र.प्रधान, अंधजनासाठी सतत काम करणारे डॉ. निरंजन पंड्या, सिकल सेल ॲनिमिया या आदिवासी भागातील असाध्य रोगावर सातत्याने कार्यरत असणारे डॉ.सुदाम काटे ही हडपसरचे भूषण असणाऱ्या मंडळींनी हडपसरच्या नावलौकीकात फार मोठी भर घातली ही अभिमानाची गोष्ट आहे.

आता ते नैसर्गिक वैभव नसलेतरी जगप्रसिद्ध सिरम इन्स्टिट्यूट मुळे तसेच आधुनिकतेने कायापालट झालेल्या हडपसरने मगरपट्टा सिटी, अमनोरा सिटी व सुप्रसिद्ध मॉल यामुळे भारतातच नव्हे तर जगात आपले स्थान निर्माण केले आहे. आय.टी. क्षेत्रातील जगप्रसिध्द विविध कंपन्या मगरपट्टा सिटीत, एस.पी.ईनफोसिटी येथे कार्यरत असून हजारो लोकांना समावून घेतले आहे ही सुद्धा हडपसर साठी अभिमानाची गोष्ट आहे.

कोरोनामुळे सर्व जग हवालदिल झाले असताना भारतातील म्हणजे हडपसरच्या सिरम इन्स्टिट्यूटने व्हॅक्सिनेशन तयार करून आशेचा किरण दिला. या व्हॅक्सिनेशनमुळे आज बऱ्यापैकी कोरोनावर मात केली असल्याचे दिसून येत आहे.

आता या कोरोनावर मात करण्यासाठी आजून एक व्हॅक्सिनेशन तयार होणार आहे ते हडपसर येथील मांजरी येथे. मांजरी येथे करोना प्रतिबंधक लशींच्या उत्पादनासाठी भारत बायोटेक या कंपनीकडून कोव्हॅक्सिन लशींचे उत्पादन होणार आहे.

हडपसरने शैक्षणिक, आरोग्य, शेती, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारीने जगात आपल नाव अधोरेखित केले आहे. त्याचा सार्थ अभिमान हडपसरकरांना वाटतो.

सुधीर मेथेकर,
लेखक हे जेष्ठ पत्रकार असून त्यांनी दैनिक लोकसत्ता मध्ये पत्रकार म्हणून लिखाण केलेले आहे.
मो.न.9730065485