प्रतिनिधी स्वप्नील कदम
पुणे : पुणे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या हवेली तहसीलदार पदाचा पदभार किरण सुरवसे यांनी स्वीकारला असून त्यांनी सोमवारपासून (ता. १२) शासकीय कामकाजास सुरुवात केली आहे.
हवेली तहसीलदार पदाचा पदभार स्विकारण्यापूर्वी किरण सुरवसे यांनी रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सुरवसे यांनी अलिबाग येथे निवासी तहसीलदार तर पनवेल येथे नायब तहसीलदार म्हणून चार वर्षे शासकीय कामकाज पाहिले आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय कोकण येथे तहसीलदार या पदावर एक वर्ष, कल्याण तहसीलदार म्हणून तीन ते साडेतीन वर्ष काम केले. त्यानंतर ते वसई येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते.
पालघर जिल्हा हा दुर्गम आणि आदिवासीबहुल आहे. या जिल्ह्यातील वसई तहसीलदार असताना त्यांनी नागरी, सागरी आणि डोंगरी भागातील नागरिकांच्या समस्या हाताळून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
दरम्यान, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना तीन प्रकरणात दोषी आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या जागी किरण सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.