प्रतिनिधी -स्वप्नील कदम
कदमवाक् वस्ती- पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एचपी गेट नंबर ३ च्या समोर ट्रक व चारचाकी गाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात शनिवारी (ता. २४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
या अपघातात चारचाकी गाडीने पाठीमागून मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिल्याने गाडीतील चार जण अडकले असून लोणी काळभोर पोलिसांसह ग्रामस्थ कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची नावे समजू शकली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे -सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत एचपी गेट नंबर ३ च्या समोर चारचाकी गाडीतून चार जण सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी चारचाकी गाडीच्या पुढे असलेल्या मालवाहू ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागे असलेल्या चारचाकी वाहन चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटून चारचाकी गाडी ही थेट ट्रकच्या खाली घुसली.स्थानिक नागरीक व लोणी काळभोर पोलीस चारचाकी गाडीत अडकलेल्या चौघांना काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस हवालदार अजिंक्य जोजारे, आडके, वाहतूक शाखेचे पोलीस, ग्रामस्थ सतीश काळभोर, आदी उपस्थित असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून अपघात झालेल्या ठिकाणी बघ्यांनी गर्दी केली आहे.
दरम्यान, पुणे – सोलापूर महामार्गावर व सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात टँकर लावले जातात. याठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब ठरली आहे. त्यामुळे अपघातात वाढ होत आहे. लोणी काळभोर वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी लागणाऱ्या टँकरवर व रिक्षावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.