उत्तम संस्कारांमुळे विद्यार्थी घडतात : दिलीप आबा तुपे – जनरल बाॅडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा
हडपसर ,वार्ताहार .उद्याचा भारत प्रत्येक शाळेतील वर्गात घडत असतो. शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करतात. विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवून मार्गदर्शन केले तर 21 व्या शतकातील स्पर्धेत टिकून राहतील असे सुजाण नागरिक घडतील.शालेय वयातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने विद्यार्थी निर्णयक्षम घडतात. उत्तम संस्कारांमुळेच विद्यार्थी घडतात असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य दिलीप आबा तुपे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात देशाचे लोकनेते,रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदरावजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन व कृतज्ञता सप्ताहांतर्गत विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे उच्च माध्यमिक विभागाचे माजी सहसचिव ,प्राचार्य डाॅ.नानासाहेब गायकवाड होते.प्रमुख उपस्थितीत सहविभागीय अधिकारी शंकर पवार,जनरल बाॅडी सदस्य अरविंद तुपे,रामदास जगदाळे,आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे,चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर,प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर,इंग्लिश मिडिअमच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुशीर,झीनत सय्यद,साधना विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत उपस्थित होते
निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,रयत मॅरेथॉन,रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,एन.सी.सी. व एन.एम.एस.एस.अशा विविध स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पदक व करंडक ,पुस्तक देऊन गौरविण्यात आले. उपक्रमशील शिक्षक म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक कुमार बनसोडे व उपक्रमशील विज्ञान शिक्षक म्हणून नितीन जगदाळे यांची संस्थेच्या वतीने निवड झाली. त्यांचाही कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.मान्यवरांनी सर्व बक्षीसपात्र विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे कौतुक व अभिनंदन केले.
प्रमुख पाहुणे नानासाहेब गायकवाड म्हणाले ,स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी विषयाचा सखोल अभ्यास करतात. सहशालेय स्पर्धा,कला,क्रीडा याद्वारे उत्तम विद्यार्थी घडतात. साधना संकुलातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाले तर त्यातूनच सुजाण नागरिक व जबाबदार भारत घडेल.
सहविभागीय अधिकारी शंकर पवार म्हणाले, पालकांनी विद्यार्थ्यांवर स्वतःचे विचार न लादता विद्यार्थ्यांचा कल ओळखून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात आणि क्षेत्रात करिअर करण्याची मोकळीक द्यावी. विद्यार्थ्यांनीही स्वतःचे कलागुण ओळखून स्वतःला घडवावे. बक्षीसपात्र विद्यार्थी व यशस्वी व्यक्तींचा आदर्श घेऊन उत्तम यश मिळवावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ व ज्ञानेश्वर सरोदे यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापिका योजना निकम यांनी मानले.