पुणे

“पुणे हद्दीतील मिळकतधारकांना करामध्ये अभय योजना लागू करावी, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची आयुक्तांकडे मागणी

पुणे (प्रतिनिधी )
महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असून महापालिकेची कर योजना अन्यायकारक असल्याने नागरिकांसाठी अभय योजना सुरू करावी अशी आग्रही मागणी बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहरप्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनद्वारे केली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक मिळकतधारकांना मिळकत कर वेळेवर भरता येत नसल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या दोन टक्के चक्रवाढ व्याजामुळे म्हणजेच वर्षाला 24 टक्के व्याजामुळे मुद्दलीवर मोठ्या प्रमाणात व्याज जमा होत असल्याने कर आकारणी संकलन कार्यालय टॅक्स भरताना तो मोठा फुगवटा होतो व आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना हा टॅक्स भरणे शक्य होत नाही. ही निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे अभय योजना अंतर्गत पुणे शहरातील अनेक वर्षापासून थकीत असणाऱ्या मिळकतीचा वसूल करण्यासाठी व्याजावर 80 टक्के सवलत देऊन पुणे करांना वाढीव मिळकत करातून दिलासा देण्याबाबत निर्णय घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे,
पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर योग्य निर्णय होऊन अभय योजना त्वरित लागू करण्यात यावी अशी मागणी शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली.

वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार….
पुणे महापालिका हद्दीतील मिळकतधारकांसाठी असलेली कर प्रणाली व त्यावर व्याज लावून नागरिकांना सोसावा लागणारा भुर्दंड अन्यायकारक आहे यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन अभय योजना लागू करण्याची मागणी केली आहे, या संदर्भात योग्य निर्णय झाला नाही तर वेळप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार व मिळकतधारकांना दिलासा दिला जाईल.
प्रमोद नाना भानगिरे
शहरप्रमुख – बाळासाहेबांची शिवसेना – पुणे