पुणे

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – शून्यातून विश्व उभारणाऱ्याच्या नावाचा पुरस्कार शून्यातून विश्वाला वाचविणाऱ्याला अदार पुनावाला यांना

पुणे दि.८: देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतीगृह संकुलाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला, खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आज चीनमधून उद्योग बाहेर पडत असताना हे उद्योग भारतात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. मात्र अशा उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल, त्यासाठी त्याप्रकारचे शिक्षण द्यावे लागले. त्यादृष्टीने भारती विद्यापीठासारख्या संस्थांना महत्व आहे.

देशाच्या विकासात स्टार्टअपची भूमिका महत्वाची
भारतीय युवकांनी तंत्रज्ञान युगात आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारत आणि महाराष्ट्रातही अनेक स्टार्टअप तयार होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाने ही परिस्थिती निर्माण केली आहे. या वेळेचा उपयोग आपण केला तर आपल्या देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख प्रस्थापित करता येईल. या अमृतकाळात पुढील २५ वर्ष आपल्यासाठी महत्वाचे आहेत. यात चांगली शैक्षणिक व्यवस्था निर्माण केली तरच आपण आपल्या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो.

औद्योगिक विकासासाठी उत्तम शिक्षण आवश्यक
आज तंत्रज्ञान क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. संरक्षण उत्पादनात आपण आयात करणारे होतो. मात्र आज अनुकूल व्यवस्था निर्माण केल्याने आपण संरक्षण उत्पादने निर्यात करू शकतो. पुण्यातील औद्योगिक प्रगती येथील शैक्षणिक विकासामुळे झाली. कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने पुणे राज्याचे उत्पादनाचे केंद्र आणि उद्योगांसाठी आकर्षण होऊ शकले. भारती विद्यापीठासारख्या विद्यापीठाने मनुष्यबळ विकासाचे मोठे कार्य केले.

भारती विद्यापीठाने विदेशासारखे शैक्षणिक परिसर निर्माण केले. एक मिशन म्हणून त्यांनी हे काम हातात घेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य केले. भारती विद्यापीठाने विदर्भातही असा शैक्षणिक परिसर निर्माण करावा. मराठवाडा आणि विदर्भात अशी शिक्षण व्यवस्था निर्माण झाल्यास महाराष्ट्र देशाच्या विकासात मोठे योगदान देणारे राज्य ठरेल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

स्व.पतंगराव कदम यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद
स्व.पतंगराव कदम यांच्याकडे पाहिल्यावर आश्वासकता वाटायची. त्यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद होती. शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. म्हणून १९० पेक्षा अधिक संस्था भारती विद्यापीठांतर्गत दिसून येतात. केवळ उच्च शिक्षण नाही तर गुणवत्तापूर्व शिक्षण देण्याचे कार्य त्या माध्यमातून होते आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

शून्यातून विश्व उभारणाऱ्याच्या नावाचा पुरस्कार शून्यातून विश्वाला वाचविणाऱ्याला
अदार पुनावाला यांना या पुरस्काराच्या माध्यमातून देशातर्फे धन्यवाद देण्याचे काम झाले आहे. जगाला भारताची ताकद दाखविण्याचे कार्य सीरम इन्स्टिट्यूटने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातच लस निर्मितीचा निर्धार केला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ही लस पोहोचली. म्हणून सीरमसारख्या संस्थेचा अभिमान वाटतो. स्व.पतंगराव कदम यांच्या नावाचा अर्थात शून्यातून विश्व उभारणाऱ्याच्या नावाचा पुरस्कार शून्यातून विश्वाला वाचविण्याचे कार्य करणाऱ्याला दिला ही महत्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

* वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता-शरद पवार*
खासदार श्री.पवार म्हणाले, आरोग्य विषयक नव्या सुविधा निर्माण करताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारती विद्यापीठासारख्या संस्था हे करू शकतील. जगात नवनवे संशोधन होत आहे, बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन समृद्ध पिढी घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संशोधनात लक्ष केंद्रीत करून देशासमारेचे प्रश्न सोडविण्याला हातभार लावावा. या नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठ देशाला देईल असा विश्वास श्री.पवार यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केले. शैक्षणिक क्षेत्रात द्रष्टे म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रश्न असलेल्या पाणी प्रश्नाचा जाणकार म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल. रयत शिक्षण संस्थेशी असलेली बांधिलकी त्यांनी कधी सोडली नाही. त्यांच्या नावाचा पुरस्कार अदार पुनावाला यांना देण्यात आल्याचा आनंद आहे.

जगात १६० देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक १०० मुलांपैकी ५० मुले सीरमची लस वापरतात. महाराष्ट्र आणि देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. सामाजिक भान ठेवून अदार पुनावाला यांनी वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला १५० पेक्षा अधिक वाहने दिली आहेत. मानवाचे प्रश्न सोडविण्याचे काम करताना समाजाला मदत करण्याचे कार्य ते करत असतात.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी विशेष उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे आज ही संस्था विविध विद्याशाखांमध्ये प्रगती करीत आहे. हिमाचल प्रदेश आज शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. हिमाचल प्रदेशच्या डॉक्टरांनी देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात लौकीक मिळविला आहे.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुढे गेल्यास सुधारणा निश्चितपणे करता येते. वैद्यकीय क्षेत्रातदेखील तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. हिमाचल प्रदेशने वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणांसोबत उच्च शिक्षण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.पुनावाला म्हणाले, सिरम इन्स्टीट्यूटच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारत आणि जगाची लशीची मागणी पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केल्याने ७० ते ८० देशांना मदत करता आली. राज्य आणि केंद्र सरकारचेही यात सहकार्य मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वप्न आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण भारतात आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार कदम म्हणाले, भारती विद्यापीठाच्या स्थापनेच्या ५८ वर्षाच्या काळात ९० हून अधिक शाखा ग्रामीण भागात आहेत. सामाजिक बांधिलकीचा वसा स्व.पतंगराव कदम यांनी घालून दिला आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही विद्यापीठाने अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कोविड काळात विद्यापीठाच्या रुग्णालयाने रुग्णसेवेचे काम केले. गोरगरिबांच्या सेवेसाठी नूतन सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. संस्थेने मानवता जपण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या हस्ते पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबाबत अदार पुनावाला यांना प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्राड पवार यांनी भारती विद्यापीठ गोल्डन ज्युबिली म्युझियमला भेट दिली.