छत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिवस. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या राज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास तब्बल ३० फुटी पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांना अभिवादन करणारे फलक लावण्यात आले होते. ज्यामुळे डेक्कन परिसरातील संपूर्ण वातावरण शंभूमय झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार तथा “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते डॉ.अमोल कोल्हे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महाराजांना वंदन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी “स्वराज्यरक्षक” संभाजी महाराजांच्या जयघोषानांनी जयघोष करत संपूर्ण डेक्कन परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी बोलताना डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की,” सन १६८१ साली, मराठा साम्राज्याचे तेजस्वी महानायक छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. आज आपल्याकडून छत्रपतींच्या विचाराचे वारसदार म्हणून महाराजांचा खरा इतिहास जगासमोर मांडणे एवढी एकच माफक अपेक्षा आहे. छत्रपतींच्या विषयांमध्ये कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये”
तर शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी म्हणूनच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यभूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी माझ्या राजाला कुठल्यातरी एका धर्मापुरते मर्यादित ठेवू इच्छित नाही. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे १८ पगड जातीधर्मियांच्या रयतेचे राजे होते, त्यांना आम्ही स्वराज्यरक्षक म्हणूनच संबोधनार. त्यांना केवळ एका धर्माच्या चौकटीत बसवण्याचे काम हे समाजातील कोत्या प्रवृत्तीचे लोक करत आहेत, त्याला आमचा ठाम विरोध आहे” .
याप्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख,भगवान साळुंखे,संदीप बालवडकर,मृणालिनी वाणी,विजय ढाकले,काका चव्हाण, संगीता बराटे , महेश हांडे,रोहन पायगुडे, दिपक कामठे,अर्चना चंदनशिवे , शरद दबडे , , आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.