पुणे

डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात अनोखी पत्रलेखन स्पर्धा – हडपसर मध्ये सामाजिक संस्थांचा पुढाकार

हडपसर (प्रतिनिधी)
जुन्या जमान्यातील आठवणी चिरकाळ टिकवून ठेवणारे माध्यम “पत्रलेखन” होते. हल्ली व्हाट्स अप , फेसबुक अशा अतिजलद संपर्क साधण्याच्या युगात
पत्रलेखनाचा विसर पडत चालले आहे.
मोबाईलच्या नव्या जमान्यात विसर पडलेल्या पत्रलेखानाची मुलांना माहिती व्हावी, विचार प्रगट करणारे लेखन त्यांच्या हातून व्हावे. या उद्देशाने हडपसर मध्ये पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

हडपसर साहित्य व संस्कृती मंडळ व शिवसमर्थ सिद्धेश्वर संस्था, संस्कार विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर येथे पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते.हि स्पर्धा येथील लोहिया उद्यान येथील हिरवळीवर भरली होती.या स्पर्धेमध्ये १५ वर्षाच्या मुलांपासून ते ८० वर्षाच्या जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.

शहरातील वाढती गुन्हेगारीला आळा कसा बसवावा यासाठी पोलीस महासंचालकस पत्र, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पार्श्वभूमीवर हुतात्म्यांना पत्र, आवडलेला उत्कृष्ट चित्रपटाच्या विषयावर आपल्या भावाला/बहिणीला तो का पहावा यावर पत्र,आपल्या आवडत्या खेळाडूस पत्र, ऑनलाईन शिक्षणासंदर्भात आपले मत आपल्या आई/वडील/शिक्षकांना पत्र,कोरोनाने काय दिलं व काय घेतले यासंदर्भातील आपल्या मित्राला पत्र
यासारख्या विषयांवर पत्रलेखन करून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.

यावेळी हडपसर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुधीर मेथेकर, माजी नगरसेविका उज्वला जंगले, जेष्ठ नागरिक आशा शिंदे, जयवंत हापन, माधव उंडे, पुरुषोत्तम थेटे, मा.नगरसेवक शिवाजी पवार, सिद्धेश्वर संस्थेचे डॉ. शंतनू जगदाळे, समर्थ संस्थेच्या मनीषा वाघमारे, प्रा.कुलकर्णी सर, महादेव धर्मे, साहित्य सम्राटचे विनोद अष्टूळ, राहुल टकले, दिगंबर माने, बापू जगताप, राजेंद्र बाजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रलेखनाच्या प्रभावी माध्यमामुळे संपर्क साधता येत असे. याद्वारे दिलखुलास संवाद ,एकमेकांच्या भावना , कार्याची दिशा त्याचबरोबर आंतरिक ओढ निर्माण केली जाते. या स्पर्धेद्वारे जुन्या आठवणीना उजाळा देण्यात आलाआहे. चार वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली होती.यातील उत्कृष्ट पत्रलेखन करणाऱ्या विजेत्यांना पारितोषिक देऊन सम्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक सुधीर मेथेकर, मनीषा वाघमारे व डॉ. शंतनू जगदाळे यांनी दिली.

 

हडपसर येथील डॉ. राममनोहर लोहिया उद्यानात पत्रलेखन स्पर्धा संपन्न झाली. पत्रलेखन स्पर्धेची सुरुवात 2017 साली सुरु केली होती. मध्यंतरी कोरोना मुळे दोन वर्षे स्पर्धा घेता आली नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षीची ही पाचवी पत्रलेखन स्पर्धा होती.

सुधीर मेथेकर

अध्यक्ष – हडपसर साहित्य संस्कृती मंडळ