पुणे

पती पत्नितील वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला अन वाद मिटविण्याचा बहाणा करून जावयाने सासूवर केला चाकू हल्ला सतर्क पोलीस अधिकाऱ्यामुळे मोठा अनर्थ टळला

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन न्युज)
 मुलीला तिच्या पतीकडून सतत होणारा त्रास असह्य झाल्यावर हा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला परंतु तेथे हा वाद मिटल्याचे भासवत जावयाने पोलीस ठाण्यातच सासूवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार हडपसर चक्क पोलीस ठाण्यातच घडला. मात्र, दक्ष पोलीस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु हा सर्व प्रसंग पोलीस स्टेशनमध्ये घडल्याने शहरभर चर्चा सुरु आहे.

या हल्ल्यात पुष्पा दामोदर पालवे (वय ४६, महादेव नगर, मांजरी) या जखमी झाल्या आहेत. सासरे दामोदर पालवे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानंतर मंगेश महादा तारे (२९, वडगाव शेरी) या जावयाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगेश तारे आणि पूजा तारे हे दाम्पत्य राहत आहै. मात्र, या दोघांमध्ये सतत वाद होत होते. मंगेश हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याने पूजा या आपल्या आईकडे आली. त्यानंतर मंगेश याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात आल्यावर तेथे “आता आमच्या दोघांमध्ये कसलेही वाद नाही”, असं मंगेश सांगत होता. हे सांगत मंगेश सासूच्या पाया पडू लागला आणि त्याने जॅकेटच्या खिशात भाजी कापण्याचा आणलेला चाकू अचानक बाहेर काढत सासूवर वार करण्याचा प्रयत्न केला.परंतु तेथे उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी मंगेशला पुढे होऊन रोखले व त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला.

“कौटुंबिक वाद मिटवल्याचे नाटक करत जावयाने सासूवर लपवून आणलेल्या चाकूने काही कळण्याच्या आत वार केला”. पण आमच्या पोलीस उपनिरक्षकाच्या दक्षतेमुळे पुन्हा हल्ला करण्याचा त्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला ताब्यात घेतलं”, असे हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.

पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेने अनर्थ टळला…
पोलीस स्टेशन मध्ये जावई आला भांडण मिटल्याचे नाटक केले सासुच्या पाया पडण्याच्या बहाण्याने सासुवर वार केले पण जवळच असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी प्रसंगावधान ओळखून त्याच्याकडील चाकू काढून घेतला म्हणून पुढील अनर्थ टळला.