पुणे (रोखठोक महाराष्ट्र्र ऑनलाईन न्युज}
शिक्षण विभागातील बोकाळलेला भ्रष्टाचार ऐरणीवर आला असून तीन दिवसांपूर्वीच एका लेखा अधिकाऱ्यावर लाचलूचपत विभागाने कारवाई केली असताना आता थेट परिक्षा परिषदेच्या आयुक्तांवरच फसवणूकीचा गुन्हा नोंद झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
परिक्षा परिषदेच्या आयुक्त श्रीमती शैलजा रामचंद्र दराडे (रा.सूस,पाषाण, पुणे) व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा.इंदापूर पुणे) यांच्या विरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी पोपट सुखदेव सुर्यवंशी रा.आटपाडी जि.सांगली यांच्या वहिणी पुजा पोपट यादव व निता पांडूरंग रणदिवे यांना शिक्षक म्हणून नोकरीस लावण्यासाठी आरोपी शैलेजा दराडे व त्यांचे भाऊ दादासाहेब दराडे यांनी 12 लाख व 15 लाख रूपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी सन 2019 पासून आजतागायत वेळोवेळी 27 लाख रूपये हडपसर गाडीतळ येथे भेटून दिले. पैश्यांचा पुरवठा करून देखिल नोकरीचा कॉल येत नसल्याने फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावेळी फिर्यादी यांनी हडपसर पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल केला.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरविंद गोकुळे यांनी बेरोजगार युवतींच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या महिला अधिकारी व त्यांचे भाऊ यांची सखोल तपासणी करत गुन्हा नोंदविला. वपोनि गोकुळे यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे फसवूणक झालेल्या अनेक बेरोजगार तरूण-तरूणींना मोठा दिलासा मिळाला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे आणखी काहीजण हडपसर येथे दराडे यांच्या विरूद्ध तक्रारीसाठी पुढे येतील अशी शक्यता आहे.
फसवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांमध्ये…..
परीक्षा आयुक्त शैलजा दराडे यांनी केलेल्या फसवणुकीचा आकडा साडेचार कोटीहून अधिक आहे यामध्ये अनेकांची फसवणूक झालेली आहे, १२ लाख, १५ लाख एका उमेदवाराचा आकडा असला तरी यामध्ये अनेक उमेदवारांचा समावेश आहे, यावरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक आयुक्त व त्यांच्या साथीदाराने केली आहे हे दिसतेय.
बेरोजगारांच्या फसवणुकीच्या घटना वाढल्या…….
सरकारी नोकरी लावतो म्हणून लाखो रुपये उकळणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, नोकरी मिळेल या आशेने पर्यायाने कर्ज काढून पैसे दिले जातात मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते, बेरोजगार तरुणांनी अशा आमिषांना बाली पडू नये तसेच कोणी फसवणूक केली असल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक केली नाही.
अरविंद गोकुळे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हडपसर पोलीस स्टेशन