पुणे

अहिंसाच्या मार्गाने आंदोलन करून आपण या महागाईच्या भस्मासुराला गाडायला हवे !

सुधीर मेथेकर  ( हडपसर, पुणे )

सरकारने सामान्यचे सरकार म्हणून म्हणून जनतेचे जीवनमात्र असामान्य करून टाकले आहे असं म्हंटले तर वावगे ठरणार नाही ! कशात भाववाढ करायची आता शिल्लक राहिली आहे त्या गोष्टी सरकार शोधत आहे का ? असंच काहीसं वाटतंय !

पेट्रोल, डिझेल दर वाढ केल्याने सर्व अन्नधान्य, भाजीपाला यांचे दर वाढले आहेत. ज्यांना रोज औषधांशिवाय जगणं आवघड आहे, त्या जीवनावश्यक औषधांची आवश्यकता आहे त्या औषधांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आपल्या तीन गरजां रोजी, रोटी व कपडा हे आहेत. त्यात सगळ्यांच्या किंमती जवळपास गगनाला भिडल्या आहेत, आता तर भाकरी बनवण्यासाठी लागणारा घरगूती गॅस सिलेंडरच्या किमती सुध्दा वाढवलेल्या आहेत. आता सांगा ज्यांना आज मेहनतीने चार पैसे कमवायचे तरचं त्यांच्या घरचा गॅस शेगडी पेटणार आहे त्यांनी हजार-अकराशे रुपये कसे मोजायचे ? मध्यम वर्गीयांची सुध्दा अशीच परिस्थिती असताना घरातील चुल कशी पेटवायची ?

सामान्य जनतेचा कळवळा फक्त भाषणातून दाखवून सामान्यांच्या घरातील चुल पेटणार आहे का ? याने जनतेचे पोट भरणार आहे का ? नेते मंडळी मोठी भाषणे ठोकतात, आश्वासन देतात त्यामुळे सामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? याचा विचार कोण करणार ?

आता तर ” घर घर में दिया, अंधेरा मिटायेगा ” म्हणून सांगतात अन् तेवढ्यात वीज बील वाढीचा प्रस्ताव जनतेसमोर मांडायचा म्हणजे काय हो ? थोडक्यात तोंड दाबून बुक्यांचा मार ! असंच म्हणावं का ?

सर्वसामान्य माणसाने जगण्यासाठी कोणाकडे न्याय मागायचा हो ! सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. आवश्यक वस्तूंच्या किंमती आवाक्याबाहेर जात आहेत, याकडे नेतेमंडळी डोळेझाक करत आहेत का ? पूर्वी भाववाढ विरुद्ध आंदोलने छेडली जात, शासन करत्यावर दबाव निर्माण करून भाववाढ रोखली जायची आता असे का होत नाही ? सगळे नेते म्हणजे मिलीज्युली सरकार असेच म्हणावे का ? जनतेच्या प्रश्नावर कोणी भाष्य करणारा आहे का नाही ? यावर आता जनतेनेच उठाव करायला हवा असे वाटते.

सरकार दरबारी आंदोलने करून त्यांचे लक्ष वेधून घ्यायला हवं असं वाटतं. अहिंसाच्या मार्गाने आंदोलन करून महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा दिला तसा आपण या महागाईच्या भस्मासुरा पुढे आंदोलन करायला हवे !