पुणे

“रामदऱ्याला जाणारा पूल झाला कमकुवत, प्रशासनाची आंधळ्याची भूमिका, अपघात झाल्यावर पूल होणार का जनतेचा प्रशासनाला सवाल” प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर -येथील ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या तीर्थक्षेत्र रामदरा ते लोणी काळभोर ( ता. हवेली ) दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला असून तो तातडीने दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

                        दोन अडीच महिन्यांपूर्वी या रस्त्या बरोबरच हवेली तालुक्यातील २७ किलोमीटर अंतराचे ९ रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र गेल्या दोन महिन्यांत या संदर्भात कुठलीही हालचाल प्रशासकीय पातळीवर झालेली दिसत नाही. लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या वतीने तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील कालव्यावरील पूल व रस्ता या संदर्भात बराच पत्रव्यवहार करण्यात आला असून वेगवेगळ्या ठिकाणी निवेदने ही देण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही काही हालचाल झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे या परिसरात रहाणारे नागरिक व तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणारे हजारो भाविक यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

                     दोन अडीच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ते तीर्थक्षेत्र  रामदरा या दरम्यानच्या रस्त्यासह २७ किलोमीटर अंतराचे नऊ रस्ते मंजूर झाले आहेत अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ते तीर्थक्षेत्र  रामदरा हा ४ किलोमीटर, मणेरवाडी थोपटेवाडी हा सव्वा दोन किलोमीटर, कोलवडी ते साष्टे हा ४ किलोमीटर, कोलवडी ते शितोळे वस्ती हा ३ किलोमीटर, लोणीकंद ते डोंगरगाव हा ४ किलोमीटर, थोपटेवाडी सव्वा दोन किलोमीटर,  डोंगरगाव ते वारघडे वस्ती बकोरी हा सव्वा तीन किलोमीटर, रहाटवडे ते रांझे हा साडे तीन किलोमीटर, आर्वी ते घाटे मळा हा १ किलोमीटर अशी मंजूर झालेल्या रस्त्यांची नावे असून हे काम लवकरच सुरु असल्याचे सांगण्यात आले होते. 

                        मागील काही वर्षांपांसून तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणारा रस्ता खराब झाला असून याबाबत वारंवार नागरिकांनी रस्त्यासाठी मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्ते मंजूर झाल्यामुळे हवेलीतील या रस्त्यांचे काम मार्गी लागले आहे असे स्थानिक नागरिकांना वाटले होते. 

                      पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी महामार्गावरुन सात किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र रामदरा वसले आहे. सदर मंदिराकडे जाणारा रस्ता थोडा अरुंद असून या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.

                          तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाण्यासाठी शेतीला पाणी पुरवठा करणा-या नवा मुठा उजवा कालवा ओलांडून जावे लागते. या ठिकाणी मुठा कालव्या वरील पूल १९६५ साली बांधला आहे. ५७ वर्षं वयाचा हा पूल कुमकुवत झाला आहे. या पुलाचे बांधकाम ढासळले आहे. हा पूल कधीही पडू शकतो. तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणा-या पाच हजार भाविकांना याच पूलावरून जावे लागते. याबाबत वारंवार या रस्त्याची मागणी करण्यात येत होती. रस्त्याचे काम करताना नवा मुठा उजव्या कालव्यावर नवीन पूल बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत तीर्थक्षेत्र रामदरा रस्ता मंजूर झाल्याची बातमी आल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये “सोशल मिडीया वाॅर” झाले होते. आमच्याच पक्षाच्या नेत्यांनी हा रस्ता मंजूर केल्याचे दोन्ही बाजूंचे म्हणणे होते. आता दोन अडीच महिन्यां नंतर सोशल मिडीया वाॅर करणारे कार्यकर्ते, नेते व चांगला रस्ता सगळेच गायब झाले आहेत. तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरुन जाणा-या नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे श्रेय कुणीही घ्या, रस्त्याच्या दोन्ही टोकांना सत्ताधारी व विरोधक यांनी नारळ फोडून भूमिपूजन, उदघाटन करा. परंतु रस्ता तातडीने करा अशी मागणी नागरिक करत आहेत.