हडपसर : येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक वेशभूषेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सहावारी, नऊवारी रंगीबेरंगी साड्या तर विद्यार्थ्यांनी कुर्ता, पायजमा, धोतर, टोपी, फेटा परिधान करून लक्ष वेधून घेतले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवित जल्लोष केला.
विद्यार्थीनींच्या काही ग्रुपनी वेगवेगळ्या एकसारख्या साड्या नेसल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी काळा शर्ट आणि पांढरी लुंगी, गॉगल घालून दाक्षिणात्य वेशभूषा केली होती. महाविद्यालयाच्या हरित कॅम्पसमध्ये अनेक विद्यार्थी आपआपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत ‘सेल्फी’ घेऊन सोशल मिडियावर शेअर केली, स्टेटस् आणि डीपींवर शेअर करण्यात रमले होते. महाविद्यालयाचा परिसर रंगीबेरंगी तरुणाईच्या गर्दीने फुलला होता. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी देखील पारंपरिक वेशभूषा परिधान करून महाविद्यालयात आले होते.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नृत्य व गायन स्पर्धेचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक दिनेश शिंदे यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले या कार्यक्रमामुळे मला माझ्या कॉलेज जीवनाची आठवण झाली. विद्यार्थ्यांनी याच काळात ध्येय निच्छित करून अभ्यास करावा. अशा उपक्रमातून व्यक्तिमत्त्व विकास साधावा.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितिन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, उपप्राचार्य, डॉ. शुभांगी औटी, उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. राजेश रसाळ, डॉ. प्रवीण सासणे, डॉ. नाना झगडे, प्रा. शशिकला वाल्मिकी, प्रा. मनिषा गाडेकर, प्रा. मनिषा जगदाळे, प्रा. सुप्रिया भोसले, प्रा. आशा माने, प्रा पुनम घुले, गणेश साबळे, धंनजय बागडे आदी उपस्थित होते.