एस एम जोशी कॉलेज हडपसर येथे विद्यार्थ्यांना महिला दिन व संविधान याबद्दल मार्गदर्शन
“सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षण मिळाले,यामुळे महिला कर्तृत्ववान बनल्या, परदेशामध्ये महिलांना त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आंदोलने करावी लागली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे भारतातील महिलांना मतदान करण्याचा हक्कासह सर्व प्रकारचे हक्क मिळाले, त्याकरता रस्त्यावर आंदोलने करण्यास भाग पडले नाही.
ज्या विकृत लोकांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. शेणाचे गोळे टाकले. ती विकृती अजूनही आपल्या आसपास आहे. दाखवून द्यायचे की, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असून गुणवत्ता देखील आहे.”असे मनोगत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी एस. एम. कॉलेज हडपसर येथे व्यक्त केले.
आरोग्य विज्ञान महाविद्यालय ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघ आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज हडपसर, पुणे – २८. यांच्या संयुक्त विद्यामाने “जागतिक महिला दिन” निमित्त ‘सावित्री सन्मान’ समारंभ व भारतीय संविधान आणि महीलांचे अधिकार यावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी विविध क्षेत्रातील सहा महिलांचा सावित्री सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग, प्रमुख पाहुणे म्हणून विधीज्ञ ऍड असीम सरोदे, ऍड.स्मिता सरोदे- सिंगलकर, नागपूर उच्च न्यायालय, संयोजक डॉ. एन. एस. गायकवाड प्राचार्य एस. एम. जोशी कॉलेज, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे, प्रा. संदीप चोपडे अध्यक्ष आरोग्य विज्ञान ग्रंथालय व क्रीडा विभाग, उपस्थित होते.
यावेळी चाकणकर यांनी महिला दिनाचे चित्र बदललेलं असून वीस वर्षांपूर्वीचे चित्र खूप वेगळे होते. महिला दिनाला फक्त महिलाच असत , मात्र सध्यस्थितीत महिला दिनाचे कार्यक्रम पुरुष मंडळी करत आहे. महिलांबरोबर मोठ्या प्रमाणात पुरुष देखील या कार्यक्रमांना उपस्थित असतात. यामुळे महिला दिनाचे चित्र खूप दिलासादायक दिसते, व विद्यार्थ्यांना संबोधन करताना त्या म्हणाल्या की, समाजामध्ये जगत असताना आदर्श नागरिक म्हणून आपल्या सर्वांना आपली भूमिका अधोरेखित करता आली पाहिजे अशा प्रकारे संविधान महिला हक्क व महिला आयोग याबद्दल माहिती देताना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड असीम सरोदे व ऍड स्मिता सरोदे- सिंगलकर, यांनी देखील अनुभव व संविधानिक हक्क याबद्दल जागृती करत माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. असीम सरोदे म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण सध्या खराब होत आहे. तर प्रत्येकाने स्वतःचे कर्तव्य योग्य प्रकारे पाळली तर अडचण होणार नाही. व राजकीय क्षेत्रामध्ये कायद्याचा वापर निवडक पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी ऍड. स्मिता सरोदे यांनी महिला स्वच्छतागृहाची दुरावस्थाबद्दल प्रश्न उपस्थित करत, स्वच्छतागृहांची कमतरता यामुळे महिलांचे आरोग्य याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ. रजिया पटेल, वैशाली उमदले, मीनाक्षी प्रधान, सविता कुंभार, स्नेहल वाघुले, ऋतुजा भाडळे यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते सावित्री सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एन. एस. गायकवाड यांनी केले. स्वागत प्रा. संदीप चोपडे यांनी केले.
आभार डॉ. प्रा. सरोज पांढरबळे यांनी केले.