पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिकेचे जे बजेट मांडलेले आहे ते अत्यंत निराशाजनक तथा अवास्तव आहे, असे आमचे ठाम मत आहे. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केली आहे.
गेल्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी साडेआठ हजार कोटींचे बजेट मांडल्यानंतर आज २४ मार्च २०२३ रोजी देखील पुणे महानगरपालिकेला या आर्थिक वर्षात साडेपाच ते सहा हजार कोटींचे पुढे उत्पन्न गाठण्यात यश आलेले नाही, असे असताना देखील पुणे महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून विक्रम कुमार यांनी यावर्षी साडेनऊ हजार कोटींचे बजेट मांडले ही एक प्रकारे पुणेकरांची थट्टाच केली आहे. हे बजेट किमान ३ हजार कोटींच्या तुटीचे बजेट आहे,असा थेट आरोप जगताप यांनी केला आहे.
गेली अनेक दशके लोकप्रतिनिधींच्या आड लपून हे स्थायी समितीने फुगवलेले बजेट आहे, असा आरोप करणारे प्रशासन आज वास्तववादी बजेट मांडू शकले नाही, हे या बजेट चे ठळक वास्तव आहे.
२०१७ ते २०२२ या पाच वर्षाच्या भाजपच्या काळात पुणे महानगरपालिकेची झालेली घसरण लपविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या दबावाखाली आज माननीय महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी हे बजेट मांडले आहे,
पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असताना पुणे महानगरपालिकेकडे कर भरणाऱ्या तब्बल १० लाख मालमत्ता होत्या, त्यावेळी ५ ते ६ हजार कोटींची जमा रक्कम येत होती. आज पुणे महानगरपालिकेमध्ये ३४ गावे समाविष्ट होऊन नव्याने ६ लाख मिलकती येवून सुधा तब्बल ३ हजार कोटींच्या तुटीचे बजेट मांडण्याची वेळ पुणे महानगरपालिका आयुक्तांवर आली, अर्थात या संपूर्ण फसलेल्या बजेटचे श्रेय पुणे भाजपला जाते. त्यांच्या दबावाखाली व त्यांचा गेल्या पाच वर्षातील भोंगळ कारभार लपविण्यासाठीच अशा प्रकारचे बजेट सादर करण्यात आलेले आहे, ही बाब ओळखून येणारे काळात पुणेकरांनी याबाबत भाजपला योग्य तो धडा शिकवावा, पुणेकरांना विनंती.
प्रशांत जगताप
शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस