एकेकाळी मनाचा मनाशी संवाद साधणारी पत्रलेखनाची मानसिकता काळाच्या ओघात हरवत चालली आहे. तिचे जतन करणे आवश्यक आहे असे मत जेष्ठ कवी, साहित्यिक जयवंत हापन यांनी व्यक्त केले.
हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळ, शिवसमर्थ, सिध्देश्वर बहुउद्देशिय संस्था आणि संस्कार विश्व वतीने पाचव्या पत्रलेखन स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात हापन बोलत होते.
यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून यावेळी सन्मानित करण्यात आले. बक्षिसे व प्रमाणपत्र जेष्ठ कवी श्री.जयवंतराव हापन हस्ते देण्यात आले. यावेळी सर्वात तरुण आशा शिंदे – अर्थात वय वर्षे फक्त 81 वर्षे आवर्जून उपस्थित होत्या. यावेळी आशा शिंदे, दुर्गेश पिंगळे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक सुधीर मेथेकर यांनी केले तर सोहळ्याचे नियोजन मनिषा वाघमारे, दिपक वाघमारे व पार्थ यांनी केले अभ्यासिकेची माहिती दिली. मनिषा वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार प्रमोद गिरी व दिगंबर माने उपस्थित होते.
जयवंत हापन आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानाने माणसं जवळ आलीत पण मनानी आणि विचारांनी एकमेकांपासून फार दूर चाललीत हे वेळीच लक्षात यायला हवे.भ्रामक जगात हरवत चाललेली ही मानसिकता आपणच पुढे येवून बाजुला सारली पाहिजे. जीवनात कितीही तंत्रज्ञान आले तरी वाचन लेखन चिंतन आणि मनन या गोष्टींना पर्याय नाही.
इंटरनेटच्या जगात आपल्या आवडीपेक्षा निवडीला फार महत्व आहे.त्यावरच आपले भविष्य आणि जगाचे भवितव्य आहे.
ज्यांनी पत्रलेखन स्पर्धेत सहभाग घेतला त्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.