पुणे

शहरातील पाश्चिमात्य खाद्यपदार्थापुढे उत्तम पर्याय – देहाती पेये, खाद्यपदार्थला परत अच्छे दिन…

देहाती पेये, खाद्यपदार्थला परत अच्छे दिन
————————————————-
घरातील चुल बाहेर गेली अन् बाहेर गेलेल्या चुलीवरच्या खाद्यपदार्थास आता “डिमांड” आली आहे. त्यामुळे शहरात बर्याच ठिकाणी चुलीवरच्या पदार्थांना मागणी वाढत आहे. पुण्यात एक म्हण प्रसिद्ध आहे “फिरून फिरून भोपळे चौकात” किंवा इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतो असंच काहीसं म्हणाव लागेल !

घरातील गृहिणीला चुलीच्या धुराचा त्रास होऊ नये, चुलीसाठी लागणार्या सरपणासाठी वृक्षतोड होऊ नये आणि या कारणाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, म्हणून घरोघरी, रॉकेलवर चालणारे स्टोव्ह आले, गोबरगॅस वरील शेगड्या आल्या त्यानंतर अत्याधुनिक एलपीजी गॅसच्या शेगड्या आल्या अन् शहरातील घराघरातील “चुली” बंद झाल्या ! ग्रामीण भागात आजूनही काही ठीकाणी चुलीवर चहापाणी, स्वंयपाक होतो तो भाग निराळा !

नोकरी, धंद्यानिमित्ताने खेड्यापाड्यातील तरुणाई गांव सोडून शहरात आली आणि या धावपळीच्या शहरात स्थिरावली. रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळलेल्यांना कधीमधी गावाकडील चुलीवरच्या जेवणाची आठवण यायला लागली अन् त्यातून शहरात देखील चुलीवर वरील जेवण तयार करणारी धंदेवाईक मंडळींनी ग्राहकाची नाडी ओळखून शहरातील विविध भागात बस्तान मांडायला सुरुवात केली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे हे पाहून मग चुलीवरच्या भाकरी, चुलीवरील मटण, काळ्या मसाल्याचे पारंपरिक पदार्थ, गुळाचा चहा अशा व्यवसायाला अच्छेदिन यायला सुरुवात झाली.

पूर्वी खेड्यापाड्यात प्रत्येकाला दुध मिळेल असे नव्हते, त्यामुळे डिकाशन् अर्थात आजचा काळा चहा घरोघरी होत असे. आता तेच गुळाचा डिकाशन् काळ्या चहाच्या स्वरूपात शहरात प्रसिद्ध झाला किंबहुना त्याची खास गुळाच्या चहाची हॉटेल्स आपल्याला शहरात दिसून येत आहेत.

आज काळानुसार बदल होत आहेत, ते होणारच. परंतु आपल्या बालपणापासूनच्या ज्या आवडीनिवडी होत्या त्याची आठवण तर येणारचं ना ! जेव्हा आपण या गोष्टी आपल्या मुलांच्या समोर मांडू त्यावेळी त्यांची ईच्छा सुध्दा होणारच ना, ते कसं असते ते पहायला. म्हणून तर विकेंडला खास करून या चुलीवरील पदार्थ खाण्यासाठी आपोआप पाउले अशा हॉटेलकडे वळतात. खाण्याचा मनमुराद आनंद घेऊन परत आपपल्या रुटीनला लागतात.

आता तर विदर्भातील, मराठवाड्यातील, कोकणातील पारंपरिक खाद्यपदार्थ शहरात मिळू लागले आहेत. शेवटी म्हणतात ना अन्न हे पूर्णब्रह्म आहे ! अर्थात “जुनं ते सोनं”

सुधीर मेथेकर
(फोटो गुगल वरून घेतला आहे)