पुणेहडपसर

महापालिका कि नगरपालिका – हडपसरच्या नागरी प्रश्नांना वाचा कशी फुटणार?!

पश्चिम पुण्याच्या तुलनेत पुर्व भागाचा अर्थात हडपसर उपनगराचा विकास का खुंटला ? याचे उत्तरे निरनिराळे येऊ शकतात ! यात कोणी म्हणतील राजकीय पक्षांची सुधारणा संदर्भातील अनास्था तर काही म्हणतील महापालिका फारसं लक्ष देत नाही, तर काही नगरसेवक म्हणतील आम्ही प्रशासनासमोर विविध योजना मांडतो परंतु त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते ! कारणे काहीही असोत एकमात्र खरं की पुर्व हडपसर उपनगराला महापालिकेत दोन वेळा महापौर पद, दोन वेळा उपमहापौर पद तर एक वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष पदही मिळाले, परंतु म्हणावा तसा पूर्व भागाचा विकास झाला का ? तर नाही असेच येथील नागरिकांना वाटते !

जो काही विकास झालेला दिसतो तो मोठमोठ्या टाऊनशिप मुळे (मगरपट्टा सिटी, अमनोरा पार्क आदी) झाला असा समज येथील नागरिकांचा आहे. मग या परिसराचा विकास का झाला नाही ? एकतर येथील राज्यकर्त्यांना प्रशासकीय अधिकारी जुमानत नसावेत किंवा या प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असावे असे बोलले जाते.

विस्ताराने सर्वात मोठ्या पुणे महापालिकेच्या परिसरातील विकास शक्य होणार नसल्याने या पूर्व भागात महापालिका असावी हे येथील जाणकारांनी सातत्याने मांडले, पाठपुरावा केला परंतु ते केले गेले नाही. परंतु आता सत्तांतर झाले अन् काही राजकीय नेत्यांच्या आग्रहाखातर शासनाच्या निर्णयानुसार फुरसुंगी उरुळी देवाची ही नगरपालिका अस्तित्वात येणार आहे !

परिसरातील नेत्यांनी असे म्हटले आहे की, ही नगरपालिका अस्तित्वात आल्यावर “नवीन पुणे” अशी ओळख निर्माण होईल एवढेच नव्हे तर भविष्यात नगरपरिषदेची महापालिका होईल ! तर या संदर्भात मात्र फुरसुंगी ग्रामस्थांचा (अर्थात फुरसुंगी नागरी कृती समिती) या नगरपालिकेला विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार महापालिकाच शास्त्रशुध्द पध्दतीने विकास करु शकते.

महाराष्ट्र शासनाने या दोनही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायला हवा कारण नुकतीच एक माहिती समोर येत आहे की आता हडपसर-वाघोली अशी महापालिका लवकरच करण्याचा निर्णय होणार आहे !

जर पूर्व भागाची स्वतंत्र महापालिका करण्यात येणार असेल तर फक्त मधील दोन गावे घेऊन नगरपरिषद करण्याने असा कोणता मोठा फायदा परिसरातील रहिवाशांना होणार आहे ? एकाच परिसरात एक नगरपरिषद आणि एक महापालिका म्हणजे सख्खे आणि सावत्र भाऊ नांदतात असे चित्र दिसेल ! चित्र दिसलं तरी हरकत नाही परंतु त्यात गरीब-श्रीमंत असा भेद निर्माण झाला तर मात्र त्रासदायक ठरू शकते !

पूर्वी पासून जी पूर्व भागातील स्वतंत्र महापालिकेची मागणी होती व आजही आहे त्याचा साकल्याने विचार शासनाने करायला हवा. यामुळे पुणे महापालिकेवर येणार ताण कमी होऊन एकसंध विकास होऊ शकतो.

सुधीर मेथेकर
हडपसर, पुणे