पुणे – महात्मा फुले जयंतीनिमित्त राजस्थान सरकारने अलीकडेच सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा अशी मागणी जेष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केली आहे.
या संबंधात जारी केलेल्या पत्रकात शिवरकर यांनी म्हटले आहे की महात्मा फुले यांनी सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात दिलेले योगदान सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी मान्य केले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनीही महात्माजींच्या कार्याला सलाम केला आहे.
त्यांच्या कार्याचे स्मरण अधिक व्यापक पद्धतीने व्हावे यासाठी राजस्थान मधील काँग्रेस सरकारने महात्मा फुले जयंतीची सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली आहे, तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारने त्वरित घेतला पाहिजे किंबहुना देशपातळीवरही या निर्णयाची अंमलबजावणी होणे अधिक संयुक्त ठरेल असे प्रतिपादनही शिवरकर यांनी या पत्रकात केले आहे.
यंदाची महात्मा फुले जयंती होऊन गेली असली तरी सुट्टीचा निर्णय लगेचच जाहीर केला तर पुढील वर्षापासून त्याची अंमलबजावणी करता येऊ शकेल असेही शिवरकर यांनी या पत्रकात म्हटले आहे.