वर्तमानपत्रात रोज एकतरी बातमी अशी असते की अमक्या व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक झाली, सोशल मिडियावरील ओळखीचा फायदा घेऊन तरुणांना/तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून काही वेळा बलात्कार करून तर काही वेळा आर्थिक फसवणूक करून नुकसान केले, तर काही वेळा सेक्सटॉर्शनच्या द्वारे बदनामी करु अशा धमक्या देऊन फसवणूक केल्या जात आहे. या विळख्यात सुशिक्षित असो की जेष्ठ नागरिक असो अशांना गोवले जात आहे. ही गंभीर बाब आहे.
खरं तर पोलीस यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते, वर्तमानपत्रातून वेळोवेळी सावधगिरीच्या सुचना दिल्या जात आहेत तरीही अशा घटना वारंवार घडतात कारण विविध आमिषे दाखवून सायबर क्राईमवाले आपल्या जाळ्यात ओढतात ! यातून पश्चातापाची वेळ येते तर काही वेळा आपले सर्वस्व गमवावे लागते.
आपण फक्त पुणे शहराचा विचार केला तर एका राष्ट्रीय वर्तमानपत्राच्या बातमी नुसार एक जानेवारी-22 ते आज पर्यंत सोशल मीडियाद्वारे फसवणूकीच्या पाच हजार तक्रारी दाखल झाल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा खरंच गंभीरपणे विचार करायला हवा. आपल्या परिचयाच्या नसणाऱ्या/माहिती नसणाऱ्या वेबसाईटला प्रतिसाद द्यायला नको, त्या टाळायला हव्यात. तसेच काही कंपनीच्या नावाने आमिश दाखवणार्या जाहिराती असतात, तर काही वेबसाईट तत्काळ कर्ज देणार्या आहेत त्या उघडून पहाण्याचा मोह टाळायला हवा. पैसे कमविण्यासाठी सोशल मीडियावर टोळ्या कार्यरत आहेत ते विविध कृपत्या राबवून जाळ्यात ओढण्याचा सतत प्रयत्न करत असतात. अश्लील व्हिडीओ, पॉर्न फिल्म आदींच्या द्वारे फसवणूक केल्या जात आहे.
खरं तर या जगात कोणी कोणाला फुकट काही देत नाही हे कळतं पण वळत नाही असेच म्हणावे लागते कारण एवढे गुन्हे सोशल मीडियावर घडत आहेत ! तरीही तरुण मुले, मुली, महिला, जेष्ठ नागरिक आमिशांना बळी पडत आहेत. म्हणून म्हणावे वाटते, सोसल तेवढेच सोशल मीडियावर कार्यरत रहावे बरं. जे माहिती नाही ते पहाण्याचा प्रयत्न करू नये !
सुधीर मेथेकर,
हडपसर, पुणे