हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका मताचा ‘भाव’ किती ? हजारात की लाखात ? अपक्ष उमेदवार कोणाला देणार धक्का पुणे बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन “अभी नही तो कभी नहीं ” चा नारा देत, गुडघ्याला बाशिंग बांधून हवेली बाजार समिती साठी जुन्या व नव्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात मागणी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.यामुळे नेत्यांची डोके दुखी वाढली होती.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठे प्रयत्न केले त्यात त्यांना यश आले. पक्षाने उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावलेले नाराज उमेदवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या नाराजांवर भाजप नेत्यांनी लक्ष केंद्रित करून त्यांना आपल्या कडे वळविण्याचे प्रयत्न चालु केले आहेत. हवेली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वात जास्त विकास सोसायट्या असल्यामुळे हवेली बाजार समिती आमच्या कडे येईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाने केला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम २७ मार्चपासून लागला आहे. ही निवडणूक तब्बल दोन दशकानंतर होत आहे. या बाजार समितीतीसाठी १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यापार्श्वभूमीवर इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली असून आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काहीही झालं तरी आपल्याला विजयी मतदान झालेच पाहिजे यासाठी धनशक्तीचा वापर करण्याचे नियोजन सुरु झाले आहे. या निवडणुकीत मतांचा ‘भाव’ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल व सर्वपक्षीय भाजप मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार विकास आघाडी पॅनल या दोन्ही पॅनेल मध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील कृषी सोसायटी व ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याने पक्षात चुरस वाढल्याने अधिकृत पॅनेलपेक्षा बंडखोरीला वरिष्ठांची फूस असल्याचेही काही इच्छुकांकडून मतदारांमध्ये बिंबवले जात असल्याचे समजते. परंतु ही निवडणूक नात्या गोत्यावर जास्त चालते अशी चर्चा गावागावात सुरू आहे. त्यामुळे कोण कोणाला वगळणार की पॅनल टु पॅनल मतदान होणार यावर चर्चा रंगत आहे. या निवडणुकीत निवडून येण्यासाठी कितीही खर्च झाला तरी चालेल पण निवडुन यायचेच हा अट्टाहास उमेदवारांमध्ये दिसत आहे. या निवडणुकीत काटेकी टक्कर पहावयास मिळणार आहे. या सर्व धामधुमीत ” एका मताचा भाव ५० हजारापासुन ते १ लाखापर्यंत ” जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.