पुणे, दि. २८: महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. त्यामुळे आगामी काळात शैक्षणिक क्षेत्राला नवीन दिशा देऊन आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिपादन केले.
लोणावळा येथील दि ॲम्बी व्हॅली सिटी येथे समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी, योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, देशाची पुढची पिढी घडविण्याचे पवित्र काम शिक्षण विभागाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याच्यादृष्टीने या कार्यशाळेत एकत्र विचारमंथन करावे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण, अंगणवाडी सेविकांना नर्सरीबाबत शिक्षण, शारीरिक शिक्षण, चित्रकला, गायन, नाट्य आदी कलाविषयक शिक्षण, विद्यार्थ्यांचा मानसिक अभ्यास, नाविन्यपूर्ण उपक्रम, भारतीय संस्कृतीचा अभ्यास, शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, उपाययोजना, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यासारख्या विविध बाबीवर वैचारिक देवाण घेवाणही या कार्यशाळेत करावी. आपल्या सूचनांचा शासनस्तरावर विचार करुन शिक्षण विभागाची पुढची दिशा ठरवली जाईल.
शासनस्तरावरुन शैक्षणिक क्षेत्राची प्रगती होण्यासाठी शिक्षण सेवकांच्या वेतनामध्ये वाढ, शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ, शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश असे विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असून त्याची क्षेत्रीयस्तरावरुन अंमलबजावणी करावी. नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शैक्षणिक क्षेत्रात उपयोग करावा. सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करुन पायाभूत सुविधा अधिक भक्कम कराव्यात.
विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती असून ही संपत्ती समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात यावा. शिक्षकाने बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देवून रोजगारक्षम पिढी निर्माण करावी. प्राथमिक शिक्षण आयुष्याचा पाया असून त्यादृष्टीने पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. प्रत्येक शाळेत ग्रंथालय, क्रीडांगण असावे. शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवावी. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुन शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रस्थानी ठेवावे, असेही श्री. केसरकर म्हणाले.
प्रधान सचिव श्री. देओल म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची क्षेत्रीय स्तरावर अमंलबजावणी करणे, क्षेत्रीय स्तरावर होणाऱ्या कामाबद्दल या कार्यशाळेत चर्चा करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर देत असून त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणावर निधी सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.
श्री. मांढरे म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण, सर्वंकष शिक्षणाला विभागाने प्राधान्य दिलेले आहे. शिक्षणातील बदलते स्वरुप पाहता आगामी काळात आपल्याला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. शैक्षणिक विकासासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी सर्वांनी एकत्र येवून काम करणे, शैक्षणिक उपक्रम राबवितांना येणाऱ्या उणिवा दूर करणे हे या कार्यशाळेच्या आयोजना मागचा हेतू असल्याचे श्री. मांढरे म्हणाले.
यावेळी राज्यातील मनपाचे आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, मनपा व नगरपरिषदेचे शिक्षण प्रमुख, प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.