पुणे

“शरद पवार यांची राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा अन राज्यात राजकारणात खळबळ….

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली आहे. “प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शरद पवारांनी जाहीर केलं. ते मंगळवारी (२ मे) मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. “शरद पवार यांची राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा अन राज्यात राजकारणात चांगलीच खळबळ उडाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निर्णय मागे घेण्यासाठी आक्रमक मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या राजीनाम्याला जोरदार विरोध केला आहे. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असं आव्हान राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. तुम्हीच आमची कमिटी तुम्हीच आमचं सर्वस्व. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वतीने केलं आहे.

शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये राऊत यांनी म्हटलं आहे की, एक वेळ अशी आली, घाणेरडे आरोप-प्रत्यारोप झाले, राजकारण याचा उबग येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी देखील तेच केलं आहे. परंतु जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना त्यावेळी राजीनामा मागे घ्यावा लागला होता. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत.

दरम्यान, आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, नेमक्या कोणत्या कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे हे सांगणं अवघड आहे. मध्यमांवर अजित दादांबद्दल ज्या चर्चा होत्या, किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादी गोष्ट असेल, किंवा त्यांच्या तब्येतीचं काही कारण असेल, यावर आत्ता बोलणं चुकीचं ठरेल. त्यांना भेटू, सर्वकाही जाणून घेऊ मग यावर बोलणं योग्य ठरेल.

नाना पटोले म्हणाले, आम्हाला वाटायचं, शरद पवार शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असतील. एका विचारधारेशी लढत राहतील. परंतु त्यांनी कुठल्या कारणामुळे राजीनामा दिला आहे हे सांगणं अवघड आहे.

 

“शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, देशात आज लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी मोठा लढा सुरू आहे. अशावेळी शरद पवार यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणातून बाजुला होऊन चालणार नाही”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

बाळासाहेब थोरातांबरोबरच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांसारख्या अनुभवी ज्येष्ठ नेत्याने अशाप्रकारे अचानक राजीनामा देणं, ही निश्चित खटकणारी बाब आहे. विशेषत: केंद्रीय पातळीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन आगामी काळात भाजपाविरोधात आघाडी उभी करत असताना शरद पवारांची निवृत्ती घेणं, ही न पटणारी बाब आहे. त्यांनी असं करायला नको होतं, अशीच आमची भावना आहे. पण हा निर्णय त्यांचा अंतर्गत निर्णय असून काँग्रेस पक्ष त्यावर लक्ष ठेवून आहे.”, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा मुंबईत केली. त्यानंतर पक्षातले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना धक्का बसला आहे. हा निर्णय तुम्ही मागे घ्या अशी मागणी सगळ्यांनीच केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे तर थेट यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी संवाद साधला आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र या कार्यकर्त्यांनी त्यांचं काही एक ऐकून घेतलं नाही. अखेर सुप्रिया सुळेंनी तिथूनच शरद पवार यांना फोन केला. सुप्रिया सुळेंच्या फोनवरून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.