पुणे

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक लोकशाहीचा व सामाजिक समतेचा पुरस्कार केला : यशवंत गोसावी अण्णासाहेब मगर महाविद्यालयात व्याख्यान

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक लोकशाहीचा व सामाजिक समतेचा पुरस्कार केला. त्यांनी शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, उद्योगधंद्यांच्या निर्मितीस प्रोत्साहन, तसेच शेती व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यांनी जातीप्रथेला विरोध, कोल्हापुरात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, शिष्यवृत्ती योजना, पाणी व्यवस्था, वसतीगृह उभारणी इ. अनेक समाजहिताच्या योजना राबवल्या. असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक यशवंत गोसावी यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथी व स्मृती शताब्दी सांगता समारोह वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने व्याख्यानाचे आयोजन केले होते. उद्घाटक पोलीस उपनिरिक्षक दिनेश शिंदे व प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध इतिहास अभ्यासक यशवंत गोसावी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. विलास आढाव होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याची माहिती दिली.

छ. शाहू महाराजांनी सर्वांना समान न्याय, आधिकार मिळावा, अस्पृश्‍यांना समानतेची व माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून सरकारी नोकऱ्यात आरक्षण दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण व वृत्तपत्र काढण्यासाठी आर्थिक सहाय्य केले. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. विलास आढाव यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. एम. जे. खैरे, समनव्यक प्रा. संगीता देवकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय डॉ. ए. बी. निंबाळकर यांनी करून दिला.