पुणे दि.१५- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे शहरासाठी करण्यात आलेल्या सुस-म्हाळुंगे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि २४x७ समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बाणेर-बालेवाडी येथील मुख्य दाब नलिकांचे व पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे शहराच्या सुनियोजित आणि गतीमान विकासावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री.फडणवीस यांनी दिली.
बालेवाडी येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (दूरदृष्यप्रणालीद्वारे), आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुणे केवळ ऐतिहासिक शहर नसून भविष्यातील शहर आहे. जगाच्या पाठीवर २१ व्या शतकातील ‘नॉलेज सिटी’ म्हणून नोंद असलेले पुणे शहर आहे, ही ज्ञाननगरी आहे. पुणे शहर विज्ञान आणि नाविन्यतेची राजधानी आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचा ‘मॅन्युफॅक्चरिंग हब देखील आहे. देशातील २० टक्के उत्पादन महाराष्ट्र करतो, त्यात पुण्याचा सिंहाचा वाटा आहे. इथली वाढती लोकसंख्या लक्षात घेता राहण्यालायक वातावरण निर्माण करणे, शिक्षण, आरोग्य, चांगल्या पर्यावरणाची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.
भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून पाण्याचे नियोजन
पुण्यात पाणी मुबलक असताना वितरण प्रणालीतील दोषामुळे २५-३० टक्के पुणे तहानलेले असल्याचा विरोधाभास दिसत होता. म्हणून नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात करण्यात येत आहे. सुस-म्हाळुंगे हा वाढता भाग आहे. भविष्यात हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहे. इथे सुनियोजित विकास होत असतांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे महत्वाचे आहे. म्हणून भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
शहरात उत्तम वाहतूक सुविधांवर भर
कोरेगाव रेल्वे उड्डाणपूल आणि सनसिटी ते कर्वेनगर या पूलांमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. वाहतूक नियोजनासाठी अशा सुविधा गरजेच्या आहेत. ५ हजार विद्यार्थ्यांना मुठा नदीवरील पुलाचा फायदा होणार आहे. पुण्याचे रिंगरोडचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी २७ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा पुण्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पुण्यातील रोजगार आणि उद्योगाची गुरुकिल्ली आहे. पुण्याची मेट्रो वेगाने विकसीत होत आहे, पुढच्या टप्प्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येईल. उपनगरे मुख्य शहराशी जोडल्यावर पुण्याची वाहतूक सुरळीत होण्यासोबत मेट्रो लाभदायी ठरेल. चांदणी चौकातही महमार्गावरील कामामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. देशातील सर्वाधिक इलेक्ट्रीक बस वाहतूक पुणे शहरात आहे. भविष्यात एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे सामान्य माणसाला चांगली सुविधा देण्याचे काम करण्यात येईल.
पर्यावरण आणि गतीमान विकासात समन्वय साधणार
पुणे शहराला विकसित करण्यासाठी १५ स्मार्ट सिटीचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग पुण्यात सुरू करण्यात येत आहे. पाण्याच्या पुनर्वापरही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी वापरता येईल. मुळा-मुळा शुद्धीकरणासाठी १ हजार ९०० कोटींची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नदी निर्मळ होण्यास मदत होईल. पर्यावरण आणि गतीमान विकासात समन्वय साधत पुणेकरांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, बाणेर-बालेवाडी पाणी पुरवठा योजना हा शहरासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. शहरात अधिक वापर होत असतांना शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात नसल्याने २४x७ समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ८५ टाक्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी ६० टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. योजना पूर्ण झाल्यावर वाया जाणारे ४ टीएमसी पाणी उपयोगात आणता येणार आहे. त्यासोबत २ हजार कोटींच्या जायका प्रकल्पाद्वारे १८ सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प तयार करून प्रक्रीया केलेले पाणी इतर कामांसाठी उपयोगात आणता येणार आहे. शिवाय उद्योगासाठी हे पाणी वापरल्याने तेथे उपयोगात आणले जाणारे शुद्ध पाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. असे महत्वाचे प्रकल्प मुख्यमंत्री असतांना शहरासाठी दिल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धन्यवाद दिले.
विधान परिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, उन्हाळ्यात महिलांना पाण्याची टंचाई जाणवते. पुण्यात इतर शहरातील नागरिकही पुण्यात येतात. पुण्यात चांगले पर्यावरण आणि पाणी आहे. शाश्वत विकासाच्या उद्दीष्टाला समोर ठेवून शहरात कामे सुरू आहेत. साधू वासवानी पूलाच्या कामामुळे वाहतूकीची समस्या सुटणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रकल्पांना चालना मिळत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पुण्यातल्या पर्यावरणविषयक समस्यांबाबत सामाजिक संघटनांसोबत बैठक घेण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, पुण्याची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नागरिकांना महानगरपालिकेच्यावतीने सोई-सुविधा पुरविण्यात येत आहेत. भूमीपूजन करण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल.
माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. ‘मेरा लाईफ मेरा स्वच्छ शहर ‘ हे राष्ट्रीय अभियान मे १५ ते ५ जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरामध्ये नागरिकांच्या सहभागातून विकेंद्रित पद्धतीने थ्री आर (रिङ्युस-रियूज- रिसायकल) केंद्र उभारली जाणार आहे. या अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धेतून संकलित करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बॉटल्सपासून बनविण्यात आलेल्या टी-शर्टचे अनावरणही करण्यात आले.
बाणेर-बालेवाडी पाणी पुरवठा योजना
समान पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत बाणेर-पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या तीन टाक्या उभारण्यात आल्या आहेत. वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बालेवाडीपर्यंत ५ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या पाणी पुरवठा योजनेमुळे बाणेर बालेवाडी भागतील नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण होणार आहे.
सुस व म्हाळुंगे गावातील पाणी पुरवठा योजना
पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे गावासाठी समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे व पाण्याच्या टाक्या बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. पुढील ३० वर्षाची लोकसंख्या लक्षात घेऊन सुस गावात २ व म्हाळुंगे गावात ४ टाक्या बांधण्याचे आणि ६५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे नियोजन आहे. या कामांसाठी सुमारे ७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक ते बालेवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
मुठा नदीवरील पूल बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन
मुठा नदीवर सनसीटी सिंहगड रोड ते दुधाने लॉन कर्वेनगर या सहापदरी पूल बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा पूल ३४५ मीटर लांब आणि ३० मीटर रुंदीचा असेल. या पूलामुळे सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगर, डेक्कन, कोथरूड भागात जाण्याची सोय होणार असून या भागातील वाहतूककोंडी कमी होण्यासोबत इतर रस्त्यावरील वाहतूकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
कोरेगाव येथील रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन
कोरेगाव येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल पाडून नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पूलाच्या कामासाठी सुमारे ८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पूलाची लांबी ६४० मीटर असून बंडगार्डनकडून कॅम्प भागाकडे जाण्याकरिता चार लेनचा मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे कोरेगाव पार्क व येरवडा भागातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.