पुणे, दि. १७ ः दरवर्षीप्रमाणे हडपसर मध्ये येणाऱ्या दोन्ही पालख्यांमध्ये वारकरी व भक्तांची पूर्ण व्यवस्था व्हावी याकरिता शासनाच्या सर्व विभागाच्या यंत्रणा सक्षमपणे राबविल्या जाव्यात याबरोबरच संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा परतीच्या प्रवासातील मुक्काम हडपसरला व्हावा, यासाठी दोन्ही पालखी सोहळाप्रमुख- विश्वस्तांबरोबर चर्चा झाली आहे. यावर्षीचे वेळापत्रक तयार झाले असून, पुढील वर्षीच्या वेळापत्रकामध्ये हडपसर मुक्कामाविषयी निर्णय घेतला जाईल असे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.
हडपसरमधील साने गुरुजी भवनमध्ये आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी आळंदी देवस्थान प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुख ह.भ.प.भानुदास मोरे, संजय मोरे, अजित मोरे, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, महापालिका उपायुक्त संदिप कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त बंजरंग देसाई, पालिका सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक मारूती तुपे, योगेश ससाणे, आंनद आलकुंटे, फारूख इनामदार, अविनाश काळे, संजीवनी जाधव, शालिनी जगताप, संजय शिंदे, पल्लवी सुरसे, नितीन आरू, बाळासाहेब हिंगणे, सागर राजे भोसले उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुख भानुदास मोरे म्हणाले की, आषाढी वारी सोहळा हडपसरला विसावा असतो. परतीच्या प्रवासात नवी पेठ येथे मुक्काम असतो. वारकरी भाविकांना चांगली सेवा दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आळंदी देवस्थानप्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि अॅड. विकास ढगे पाटील म्हणाले की, वारकरी भक्त भाविकांनी सुरक्षित दर्शन घेतले, तर ज्येष्ठ नागरिक, लहान मुले महिलांची गैरसोय होणार नाही. भैरोबानाला येथून पालखी सोहळा हळूहळू पंढरपूरकडे जातो. त्यावेळी नागरिकांनी रांगेत दर्शन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार तुपे म्हणाले की, दोन्ही पालखी सोहळाप्रमुख विश्वस्त आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधांविषयी जाणून घेत त्यावर उपाय सूचविले आहेत. पोलीस, पालिका प्रशासनाकडून जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठीचे नियोजन केले आहे. भाविकांनीही सुरक्षित दर्शन घेऊन सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.
हडपसर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष अमर तुपे यांनी आभार केले.