पुणे : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची यंदा 133वी जयंती आहे. याचे औचित्य साधून कलामहर्षी बाबूराव पेंटर आर्ट फाउंडेशनच्या वतीने ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023” आयोजित करण्यात येणार आहे. येत्या 2, 3 आणि 4 जून 2023 रोजी हे आर्ट वर्क एक्झिबिशन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन येथे भरवण्यात येणार आहे, अशी माहिती बाबूराव पेंटर यांच्या कन्या विजायमाला बाबूराव पेंटर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेस कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची सून अनुराधा अरविंद मेस्त्री , नातू अर्जून अरविंद मेस्त्री, नात प्रिया रणजीत बॅनर्जी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना विजायमाला बाबूराव पेंटर म्हणाल्या, 2 ते 4 जून 2023 दरम्यान आयोजित या ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023’चे उद्घाटन 2 जून रोजी सकाळी 8 वा. 30 मिनिटांनी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे कुटूंबिय व मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. तसेच 3 जून रोजी सकाळी 9 वा. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा 133वा जयंती सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे. तर 4 जून रोजी या आर्टवर्क एक्झिबिशनचा समारोप होईल. या ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023’मध्ये संपूर्ण भारतातून जवळपास 500 व्यावसायिक कलाकार व कला शाखेचे विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांच्या कलाकृती प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.