पुणेमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात “करिअर मार्गदर्शन कार्यशाळा” संपन्न

औंध – रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष या विभागाच्या माध्यमातून हृदयम् फाउंडेशनच्या सहकार्याने एक दिवशीय “करियर मार्गदर्शन कार्यशाळा” नुकतीच संपन्न झाली. इयत्ता बारावीच्या शिक्षणानंतर शिक्षणाच्या व रोजगारांच्या उपलब्ध असणाऱ्या संधीचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा; त्याची माहिती मिळावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. अमृता डागा यांनी बारावीनंतर विविध क्षेत्रांमध्ये असणाऱ्या संधींचा परिचय करून दिला. त्यांनी करिअर निवडताना कोणकोणत्या अडचणी येतात त्याबद्दलची माहिती सांगितली. कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी कौशल्याधिष्टित अभ्यासक्रम महत्वाचे आहेत. याशिवाय प्रत्येकानी संवाद कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे, ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षमता अभ्यासाव्यात. जेणेकरून योग्य करिअर निवडणे सोपे जाते. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवण्यासाठीच प्रयत्न करायला हवे. असे मार्गदर्शन करतानाच कला, वाणिज्य, बी. बी. ए. (सी ए), बी व्होक या अभ्यासक्रमातील विविध संधीची माहिती त्यांनी दिली.

 

यावेळी त्या म्हणाल्या की, “ विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढे नेमके काय करायला हवे? असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो. या प्रश्नामुळे विद्यार्थी गोंधळून जातो. तर विद्यार्थ्यांनी असे गोंधळून न जाता विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कला, वाणिज्य आणि विज्ञान यासारख्या शाखेतून विद्यार्थ्याला आपले भवितव्य घडवता येते.

आपल्याकडे असणारे कौशल्य आपल्याला यश मिळवून देण्यासाठी पुरेसे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याविषयी नेहमी जागरूक असायला हवे.” असे सांगतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी मा. डॉ. संगीता ढमढेरे, अध्यक्ष, हृदयम् सोशल वेल्फेअर सोसायटी, पुणे यांनी मार्गदर्शन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी अध्यक्षपद भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सविता पाटील यांनी केले. प्रा. बद्रीनाथ ढाकणे यांनी महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात माहिती दिली तर शॉर्ट टर्म कोर्सविषयी माहिती डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी दिली.
या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी तर आभार डॉ. देवकी राठोड यांनी मानले.