प्रतिनिधी- स्वप्नील कदम
पुणे : पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. आता पुण्यातील एका वृत्तपत्राच्या उपनगरीय पत्रकाराची सुपारी देऊन त्याच्या खुनाचा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या वार्ताहरावर यापूर्वी दोनदा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. दुसऱ्या हल्ल्यात तर त्याच्यावर गोळीबारदेखील करण्यात आला होता. यातून तो वाचला. स्वारगेट पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत दोघाजणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे आता चौकशी सुरू झाली आहे. त्यांना न्यायालयाने 23 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रथमेश धनंजय (रा. दत्तवाडी) व अभिषेक शिवाजी रोकडे (वय 22, रा. नांदेड गाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदार वार्ताहर यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर 11 जून रोजी तक्रारदार घराजवळ थांबले असता, दोन दुचाकींवर आलेल्या पाच जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
त्या वेळी खाली वाकल्याने ते बचावले होते. याबाबत स्वारगेट पोलिसाकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात होता. यादरम्यान, आरोपी इंस्टाग्राम तसेच व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे संपर्कात होते. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होते.. पोलिसांनी परिसरातील जवळपास सव्वाशे सीसीटीव्ही तपासले. पण काहीच हाती लागले नव्हते. पोलिसांचे पथक गेल्या 15 दिवसांपासून आरोपींच्या मागावर होते. अखेर आरोपीला अटक करण्यात आली आहे.