सुधीर मेथेकर, पुणे
निसर्गाच्या सानिध्यात आनंद उपभोगता यावा यासाठी केलेले नियोजन म्हणजे पर्यटन ! परंतु अतिउत्साही मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता साहस करायला जातात अन् मग संकटात सापडतात. कधी कधी या मंडळींचा अतिउत्साह स्वतः च्या जीवावर बेततो ! असं म्हणायचे कारण नुकतीच बातमी वाचली ती लोहगडावर पर्यटक चार तास अडकून पडले ! हे पर्यटनाला गेलेल्या पर्याटंकाना जसं अस्वस्थ करणारे आहे तसेच घरातील मंडळींना, पोलीस व सुरक्षारक्षक यंत्रणा यांच्यावरही तान-तनाव निर्माण करणारे आहे याचा विचार करावा असे वाटते.
गडावर येणाऱ्यांची गर्दी आणि गडावरून खाली जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने गडावरील हनुमान दरवाजा गर्दीने पूर्ण ब्लॉक झाला असल्याचे चित्र पहायला मिळाले असे प्रत्यक्ष पर्यटनासाठी गेलेले सांगतात !
पावसाळा आला की निसर्ग सौंदर्य याचा लाभ घेण्यासाठी जी मंडळी कुठेतरी अवघड ठिकाणी अडकतात त्यांना सोडवून (रेस्क्यू ऑपरेशन) आणण्यासाठी मदत करायला जाणारे जातात अन् त्यांच्या जीवावर बेतते ! हे नक्कीच क्लेशदायक आहे ! हे आपल्याला समजत नाही असे नाही, समजते परंतु उमजत नाही हे खेदाने म्हणावे लागते.
निसर्गाच्या सानिध्यात नक्कीच पर्यटनासाठी जायला हवं परंतु होणारी गर्दी याचा मागोवा घेऊनच ! नसता वाहतुकीची कोंडी करून आपण काय साध्य करणार आहोत ? तसेच अनावधानाने घडलेल्या आपल्या गैरवर्तनामुळे निसर्गाला त्याच बरोबर आपल्याला हानी पोहचू नये असे आपले वर्तन हवे.
विशेष करून पावसाळ्यात अनेक निसर्गातील स्थळे, नयनरम्य दृश्य आपल्याला खुणावत असतात. पडणारा पाऊस, हिरवा शालू पांघरलेल्या डोंगराच्या रांगा, हिरवीगार झाडे आपले मनमोहून जाते, उंचावरून पडणारे पाण्याचे धबधबे, उडणारे तुषार आंगावर झेलण्यात एक वेगळा आनंद देऊन जातात. या नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यात खवय्येगीरी तर आलीच ! गरमागरम भूट्टे अर्थात मक्याचे कणीस, गरमागरम भजी, वाफयलेला चहा याचा आपण नक्कीच आनंद घ्यायला हवाच.
हा आनंद द्विगुणित करत असताना मात्र याला आपल्या अतिउत्साहामुळे कुठेही गालबोट लागूनये असे वाटते. विविध प्रसारमाध्यमे सुध्दा आपल्याला वेळोवेळी सूचना देऊन सतर्क करत असतात, गर्दी करु नका तसेच परिसरातील नागरिकांचे, सुरक्षारक्षकांच्या सुचनांचे पालन करायला हवे अन्यथा आपल्याला आलेल्या संकटांना तोंड द्यावे लागते हे विसरून कसं चालेल बरं ! तसेच कुटुंबातील व्यक्तींना मनस्ताप सहन करावा लागेल याचे भान ठेवायला हवे. नाही तर………!
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे, नद्या नाल्यांना पुर येत आहे. काही ठिकाणी पुल पाण्याखाली जात आहेत तर कुठे खचत आहेत तर काही ठिकाणी घाटमाथ्यावर दरडी कोसळत आहेत अशा वेळी अतिउत्साहाने स्वतः चा जीव धोक्यात घालू नये व दुसऱ्याचा देखील जीव धोक्यात घालू नये असे वाटते.
खरं तर आपल्या घरातील जेष्ठ मंडळी नेहमी सांगत आले आहेत की, आपण आप, तेज व वायू याच्याशी मस्ती करायची नसते ! जर आपण त्याच्याशी मस्ती करायला गेलो तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात हे ध्यानी असू द्यावे !
चला तर मित्र/मैत्रीणीनो आपण पर्यटनाचा, नयनरम्य निसर्गाचा आनंद घेऊ या तोही सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून !! या पोस्टमधून एवढंच सांगणं की या पावसाळ्यात विकेंडला पुणे शहराच्या आसपास गड किल्ले फिरण्याचा प्लॅन करत असाल तर काळजीपूर्वक करा.