पुणे : उत्तर भारतात पावसाने हाहाकार उडविल्याने देशभरातील हजारो पर्यटक हिमाचलप्रदेशात अडकलेल्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हडपसरमधील ११ पर्यटकांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क साधण्यात येत असून, दळणवळण बंद झाले असले तरी सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विठ्ठल बनोटे म्हणाले की, ‘पिंपरी चिंचवडमधील पाच पर्यटक रविवारी मनालीतून कुलूकडे जात असताना पावसामुळे रस्ते बंद असल्याने मंडी येथे अडकले. त्यानंतर दोन दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मंगळवारी तेथील परिस्थिती सुधारल्यावर याच पर्यटकांनी जवळच्या पोलिस ठाण्यातून घरी संपर्क साधला. त्यामुळे ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.
हिमाचल सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांशी जिल्हा प्रशासन संपर्कात असून, सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तेथील दळणवळण ठप्प झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हडपसरमधील मगरपट्टा सिटीतील एका खासगी कंपनीतील पाच जण हिमाचलमधील कसोल येथे अडकले आहेत. गुंतूर या कसोल शहराच्या खालील भागात असलेल्या लष्कराच्या तळावरून त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. तेथून ते पुढील प्रवास करणार असल्याचेही त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. हिमाचलमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही बनोटे यांनी केले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हेही हिमाचल प्रदेश सरकारमधील काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांनीही याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.
पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्ते व पूल बंद करण्यात आले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर दळणवळण सुरू होईल. त्यानंतर तेथून पर्यटक बाहेर पडू शकतील. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनही हिमाचल सरकारशी सातत्याने संपर्कात आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने मुंबईतून पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.