पुणे – ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने स्वतंत्रता लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ‘जगदंब प्रतिष्ठान’च्यावतीने दि. ५ ते १३ ऑगस्ट या कालावधीत महारक्तदान यज्ञ आयोजित करण्यात येणार असून या शिबिरात रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना ६ लाखांचे अपघाती विमा कवच दिले जाणार असून जास्तीतजास्त तरुणांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
जिल्ह्यात होणारे रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती व विविध प्रकारच्या रुग्णांवरील शस्त्रक्रियांसाठी पुण्यात सध्या रक्तपेढ्यांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यंदाही रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याची विनंती रक्तपेढ्यांकडून करण्यात येत होती. गतवर्षी ‘जगदंब प्रतिष्ठान’ने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
यंदा ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा मनोदय खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला असून या महारक्तदान यज्ञाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रक्तदात्यांला ३ लाखांचा अपघात विमा, ३ लाखांचा जीवन विमा असे एकूण ६ लाखांचे विमा कवच दिले जाणार आहे. त्याचबरोबर रक्तदात्यास आजीवन मोफत रक्त आणि नातेवाईकास एक वर्ष मोफत रक्त मिळणार आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
खासदार डॉ. कोल्हे यांनी नागरिकांनी विशेषतः महाविद्यालयीन तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघातून ५ राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक छोट्या मोठ्या रस्त्यांवर सातत्याने अपघात होत असतात. या अपघातात अनेकदा गंभीर जखमी होण्याच्या घटना घडतात. विशेषतः ग्रामीण भागातून दुचाकीवर कॉलेजला येणारे विद्यार्थ्यांचे अपघात होत असतात. अशावेळी अपघात झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे रक्तदात्यांना पेन ड्राईव्ह वगैरे सारख्या वस्तू भेट देण्यापेक्षा त्यांना गरजेच्या वेळी उपयोगी पडेल असे ३ लाखांचा अपघाती विमा आणि अपघातात मृत्यू झाल्यास ३ लाखांचे जीवन विमा कवच असे ६ लाखांचे विमा कवच देण्याची योजना आम्ही गतवर्षीपासून सुरू केली. गतवर्षी अपघात विम्याचा लाभ जवळपास २२ व्यक्तींना मिळाला आहे.
त्यामुळे यंदा शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध वरिष्ठ महाविद्यालयातही रक्तदान शिबीरे आयोजित केली आहेत. खरं तरं अपघाताच्या घटनाच घडू नये यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने अशी घटना घडली तर गरीब व्यक्ती अथवा विद्यार्थ्यांला रुग्णालयाच्या बिलासाठी उपचारापासून वंचित राहावं लागू नये म्हणून आपला हा प्रयत्न असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.