पुणे : हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ५१ गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.टोळीप्रमुख अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी (वय २२), कुलदीपसिंग उर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी (वय २१, रा. बिराजदारनगर, हडपसर), विशाल उर्फ मॅक्स किशोर पुरेबिया (वय २२, रा. म्हाडा काॅलनी, वैदुवाडी, हडपसर) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत.
जुन्नी आणि साथीदारांनी हडपसर भागात दहशत माजविली होती. त्यांच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण, घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे १४ गुन्हे दाखल आहेत. जुन्नी टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे सादर केला होता. अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी जुन्नी टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश दिले.