पुणे

“हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार ठरला… विद्यमान आमदारांची भूमिका संदिग्ध – शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पवारांकडून ग्रीन सिग्नल

(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज )
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट घेऊन भाजप शिवसेनेला साथ देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः मैदानात उतरत पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. त्यातच आता शरद पवार यांनी थेट विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून शरद पवार यांच्या गटाचा पुण्यातील पहिला उमेदवार ठरल्याचं समोर येत आहे.
पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे शहरात हडपसर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचा हुकमी एक्का आणि शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या एका बैठकीत शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. २०१९ मध्ये देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रशांत जगताप इच्छुक होते. मात्र हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे यांना संधी देण्यात आली. आता प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ दिल्यानंतर स्वतः प्रशांत जगताप यांनी पुन्हा एकदा हडपसरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर जगताप यांना तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

पवार साहेबांचा आदेश, आता निवडणूक लढणार आणि जिंकणार देखील…..

पक्षाने ४० लोकांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे संबंधित मतदारसंघामध्ये पक्षाकडून उमेदवार दिले जाणार आहेत. त्यासंदर्भात उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. मी हडपसर मतदारसंघामध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक असून निवडणूक लढवणार आहे. २०१९ मध्ये देखील मी इच्छुक होतो पण संधी मिळाली नाही, मात्र यावेळेस हडपसर लढवणार आणि जिंकणार देखील, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी ‘रोखठोक महाराष्ट्र’ शी बोलताना व्यक्त केला आहे.

 

दरम्यान, हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर चेतन तुपे नक्की साथ कोणाला देणार याचा संभ्रम अजूनही आहे. चेतन तुपे हे कधी शरद पवार यांच्या मंचावर दिसतात तर कधी अजित पवार यांच्या मंचावर. त्यामुळे चेतन तुपे यांची भूमिका स्पष्ट होत नाही. अशातच आता प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढवण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर त्यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे, अजित पवारांनी साथ सोडल्यानंतर शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे सांगणारे प्रशांत जगताप हे पुण्यातील पहिले पदाधिकारी होते. पुण्यातील शरद पवार यांच्या गटाची बाजू भक्कमपणे लावून धरत प्रशांत जगताप यांनी अजित पवारांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना त्यांच्या निष्ठेच फळ दिले असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

प्रशांत जगताप यांनी सुरु केली हडपसर मतदारसंघात पक्षाची बांधणी……
हडपसर विधानसभा मतदारसंघात आमदार चेतन तुपे यांचे समर्थक पदाधिकारी यांनी पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्यासमवेत जायचा निर्णय घेतला या निर्णयामागे आमदारांची मर्जी असल्याचे राजकीय जाणकार सांगतात मात्र आमदारांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही, शरद पवार यांच्या हडपसर मधील कार्यक्रमात आमदार तुपे व्यासपीठावर होते तर अजित पवार यांच्या कार्यक्रमातहि मांडीला मादी लावून बसले होते, त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम कायम होता, त्यातच हडपसर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अध्यक्षपदी प्रवीण तुपे, महिला अध्यक्षपदी वंदना मोडक, कार्याध्यक्षपदी सविता मोरे यांची वर्णी लावून प्रशांत जगताप यांनी बांधणी सुरू केलेली आहे, हडपसर मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मतदार मोठा असल्याने प्रशांत जगताप यांचे पारडे जड मानले जात आहे.