अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा प्लास्टिक संकलन व हस्तांतरण उपक्रम कौतुकास्पद असून विद्यार्थी, नागरिकांमध्ये प्लास्टिक वापराबद्दल जाणीव जागृती करून पर्यावरण संवर्धनासाठी आपण कटिबद्ध व्हायला पाहिजे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापनदिना निमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पर्यावरण संवर्धनाला सहाय्यभूत होईल असे प्लास्टिक संकलन अभियान वर्षभर राबविले जात आहे. त्या अंतर्गत संकलित झालेले प्लास्टिक प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेला सागर मित्र या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात येते. पर्यावरणाप्रती मा. अजित पवार यांची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या अभियानाचे प्रायोजन आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य ॲड. संदीप कदम यांनी सांगितले.
महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील प्लास्टिकचे संकलन केलेले ४८ किलो प्लास्टिक सागर मित्र संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले. सदर उपक्रमांतर्गत प्लास्टिक संकलन अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्लास्टिक संकलन अभियानाविषयी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागृती निर्माण करणे हा अभियानाचा उद्देश असल्याची सांगितले.
या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. धोंडीराम पवार, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडवणीस, अधिसभा सदस्य राहुल पाखरे, रा.से.यो. संचालक डॉ. सदानंद भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. सुनीता दानाई – तांभाळे, डॉ. राजेश रसाळ आदी उपस्थित होते.